डोंबिवली । ज्यांच्यावर शहराची जबाबदारी आहे त्यांनीच जर आपले काम व्यवस्थित केले नाही, तर तुम्ही काय म्हणाल, असाच काहीसा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. दहा अनधिकृत इमारती वाचवण्यासाठी केवळ देखावा निर्माण करत एकाच इमारतीवर कारवाई करत डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभागातील अधिकार्यांनी केला आहे. जुनी डोंबिवलीतील एका अनधिकृत बांधकामावर पालिकेने शुक्रवारी धडक कारवाई केली. मात्र तिथल्या 10 अनधिकृत बांधकामांकडे पालिकेच्या अधिकार्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. ह प्रभाग कार्यालयाकडून केवळ एका बांधकामावर कारवाई करून अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याचा देखावा उभा केलाय जातोय. या 10 अनधिकृत इमारतीवर कारवाई होऊ नये यासाठी ह प्रभाग कार्यालयाने मोठी सेटिंग केल्याची चर्चाही पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे या 10 अनधिकृत बांधकामांवर प्रभाग क्षेत्र अधिकारी अरूण वानखेडे हे कारवाई करण्याचे धारिष्ट दाखवतील का ? असा सवाल उपस्थित हेात आहे. जुनी डोंबिवली परिसरात शंकर मंदिराशेजारी असलेल्या एका अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी अरूण वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. या बांधकामाचे पिलर उभारण्यात आले होते हे पिलर पालिकेने जमीनदोस्त केले आहेत. मात्र, या परिसरात सुमारे 10 अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू आहेत. तर अनेक टोलेजंग इमारती उभ्या ठाकल्या आहेत.
मात्र त्या अनधिकृत इमारतींकडे कानाडोळा करीत
एकाच अनधिकृत बांधकामावर ह प्रभाग कार्यालयाने कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. जुनी डोंबिवली परिसराबरोबरच मोठागाव ठाकुर्ली, रेतीबंदर खाडी, देवीचापाडा, उमेशनगर, नवापाडा, गायकवाडवाडी आदी परिसरात अनधिकृत बांधकामे जोरदारपणे सुरू आहेत. या परिसरातील अनधिकृत बांधकामाकडे ह प्रभाग कार्यालयाकडून कानाडोळा का केला जातोय याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सगळ्या अनधिकृत बांधकामांकडे ह प्रभाग समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेवक यांचेही दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त हेात आहे.
जुनी डोंबिवली परिसरातील यशवंतनगरमध्ये 5 इमारतींची बांधकामे सुरू आहेत. 2 जुनी डोंबिवली गावात विहिरीच्या बाजूला एका टॉवरचे बांधकाम सुरू आहे. अर्चना बिल्डिंगच्या गल्लीत सहा मजल्याचे टॉवरचे बांधकाम सुरू आहे. गिरजामाता मंदिराच्या पाठीमागे 2 इमारतींचे कामे सुरू आहेत. ही सर्व अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची माहिती ह प्रभाग क्षेत्र अधिकारी वानखडे यांना माहित असतानाही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. एका अनधिकृत बांधकामावर कारवाई केली तशीच कारवाई इतरही 10 बांधकामांवर कारवाई करावी यासाठी जुनी डोंबिवलीतील जागरूक नागरिक पालिका आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेणार आहेत तसेच माहितीच्या अधिकारात माहितीही मागवण्यात आलीय.
अधिकार्यांचा अनधिकृत कामांना वरदहस्त
डोंबिवली पश्चिमेचा परिसर हा पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत येतो. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वात अधिक अनधिकृत बांधकामे ही डोंबिवली पश्चिमेत सुरू आहेत. रेतीबंदर खाडी किनारी रिंग रूटच्या मार्गात अनेक बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत तसेच खाडीकिनारी तिवरांची कत्तल करून बांधकामे केली जात आहेत. ह प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून अरूण वानखेडे यांनी पदभार घेतल्यानंतर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलंय. अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेत. वानखेडे हे बहुतांशी वेळ कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच सामान्य जनतेबरोबर व्यवस्थितपणे बोलत नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या कार्यालयात नेहमीच बिल्डरांची उठबस असते. त्यामुळे सामान्य जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे वानखेडे यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. कल्याण-डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अनधिकृत बांधकामांना पालिकेचे अधिकारीच संरक्षण देत असल्यामुळे स्मार्ट सिटी या शहरासाठी दिवास्वप्न ठरेल की काय़? असेच वाटते आहे.