अनधिकृत बांधकाम शोध मोहीम

0

दोंडाईचा । दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या घरकुल योजनेत लाभार्थ्यांनी परस्पर अनधिकृत बांधकाम करुन घरकुल योजनेच्या प्रारुप आराखड्यास धक्का पोहोचविला आहे. अश्या परस्पर कृत्य करणार्या लाभार्थ्यांचा शोध नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने सुरु केला असून अनेक लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान त्यांना दंड आकारुन ती रकम तात्काळ नगरपरिषदेच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेने केंद्र सरकारच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाअंतर्गत शहरात घरकुल योजना राबविली आहे. हे घरकुल लाभार्थ्यांना वापरासाठीही रितसर देण्यात आले आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या घरकुलाची मागील भिंत फोडून तेथे दरवाजा बसवित मागील बाजूनेही वापर सुरु केला आहे.

मुख्याधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश
याप्रकरणी नगरपरिषदेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी तात्काळ बांधकाम विभागाला चौकशीचे आदेश दिले. बांधकाम विभागाने पाहणीनंतर ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाची मागील भिंत पाडून त्या ठिकाणी दरवाजा बसविला आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना 13 जून रोजी रितसर नोटीस पाठविली आहे. तसेच घरकुलाच्या प्रारुप आराखड्यास सोईनुसार बदल करणार्‍या लाभार्थ्यांचा शोध बांधकाम विभाग घेत असून त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकार्‍यांनी दिले आहेत. बांधकाम विभागाने आपली शोध मोहीम जोमात सुरू केली असून अनधिकृतपणे घरकुलात फेरबदल करणार्‍या लाभार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नगरपरिषदेतर्फे देण्यात आले आहे. फेरफार करणार्‍या लाभार्थ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

भिंत तोडून काढला दरवाजा
दरम्यान, ज्या लाभार्थ्यांना नोटीस बजाविण्यात आली, त्यांना त्या नोटीसीद्वारे मागील बाजूस भिंत तोडून बसविलेला दरवाजा तात्काळ बंद करुन त्याचा वापर थांबविण्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या या कृतीमुळे इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने फेरफार करणार्या लाभार्थ्याने इमारतीचे नुकसान केले म्हणून पाच हजार रुपये दंड त्यांना आकारण्यात आला आहे. दंडाची रक्कम तात्काळ नगरपरिषद कार्यालयात जमा करण्याचे नोटीसीत नमूद केले आहे. ही दंडाची रक्कम न भरणार्‍या लाभार्थ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या नोटीसीत नमूद केले आहे.