अनधिकृत बांधकाम समितीबाबत आयुक्तांसमोर सुनावणी

0

जळगाव । जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीचे सभापती पद गेल्या दोन-तीन पंचवार्षीक पासून उपाध्यक्षाकडे होते. यावेळी उपाध्यक्षाकडून पदभार काढून ते आधीचे पदभार असलेले महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांना देण्यात आले. अगोदर खातेवाटप झालेल्यांकडे पुन्हा पदभार देणे हे ग्रामपंचायत अधिनियमान्वये अनधिकृत असून समिती सचिवांनी तसा ठपका देखील निवडीवर ठेवला आहे. चव्हाण यांच्याकडे अनधिकृत बांधकाम सभापतीपद देण्यात आल्याने भाजपाचेच जलव्यवस्थापन समिती सदस्य पल्लवी सावकारे यांनी आयुक्तांकडे समिती विखंडीत करावे याबाबत 9 जून रोजी तक्रार केली होती.

आयुक्तांनी याबाबत 19 जून रोजी सुनावणी ठेवली असून जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, मुख्यकार्यकारी अधिकरी कौस्तुभ दिवेगावकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी निवड समिती सचिव नंदकुमार वाणी यांच्यासह बांधकाम समिती सभापती रजनी चव्हाण यांना आयुक्तांसमोर सुनावणीसाठी हजर रहावे असे आदेश प्राप्त झाले आहे. यावरुन भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. सुनावणीसाठी स्वतः उपस्थित रहावे अथवा वकीलामार्फत म्हणणे मांडण्याबाबत कळविण्यात आले आहे.

बोदडेंनी केली तक्रार
मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांनी अध्यक्षांनी अनधिकृत बांधकाम समिती सभापती निवड केले असल्याने त्यांना पदावरुन हटविण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे वकीला मार्फत पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या पत्राबाबत देखील अद्यापर्यत खुलासा देण्यात आलेला नाही.