भुसावळ । जंक्शन स्थानकाबाहेरील रेल्वेच्या जागेवरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या सुरू करून राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी बळ दिले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने बळाचा वापर करून या विक्रेत्यांना हटवल्यास प्रसंगी रेल्वे रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आल्याने रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
आर्थिक चिरीमिरीचा आरोप
रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक लोहमार्ग पोलिसांच्या नाकावर टिच्चून अनेक विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाच्या मार्गाची वाट बिकट केल्याचा प्रकार अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. अर्थात यामागे यंत्रणेची ’आर्थिक चिरीमिरी’ हा देखील भाग असल्याचा उघड आरोप सुज्ञ नागरिक करताना दिसून येतात तर ज्यांनी पैसे देण्यास का-कु केली त्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा लागलीच सरसावते, असा आरोपही केला जातो. अर्थात आरोपांबाबत यंत्रणांनी आम्ही त्या गावचेच नाहीत हा पवित्र नेहमीच घेतलेलाही दिसून येतो.
जंक्शन रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी अहोरात्र प्रवास करतात. प्रवासात लागणारे पाणी, नास्ता तसेच अन्य चीज वस्तू त्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी रविवारी त्यांच्या नेतृत्वात 12 खाद्य पदार्थांच्या गाड्या सुरू केल्या. यापूर्वीदेखील या विक्रेत्याच्या कुटुंबियांनी 50 वर्ष येथेच पोट भरले मात्र यंत्रणेच्या दुजाभावामुळे त्यांना व्यवसाय करणे कठीण झाल्याने आपण त्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगत यंत्रणेने त्यांना या जागेवरून हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास रेल्वे रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रसंगी विक्रेत्यांनी त्यांचे स्वागतही केले.
पर्दाफाश आंदोलन करणार
गेल्या 50 वर्षांपासून या विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी आपले पोट रेल्वे स्थानकाबाहेरच छोटा-मोठा व्यवसाय करून भरले. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन व सुरक्षा बलाने त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास रेल्वे रोकोसह तीव्र स्वरूपाच आंदोलन छेडण्यात येईल. दरमहा हप्ते न देणार्या विक्रेत्यांवर सुरक्षा बल कारवाई करते तर हप्ते देणार्यांना अभय देते, असा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पर्दाफाश आंदोलन छेडण्याचा इशारा जगन सोनवणे यांनी केला आहे.
..तर रेल्वे रोको निश्चित
राष्ट्रीय रेल्वे पॅसेंजर सहाय्यता मजदूर सेना असा फलक प्रत्येक खाद्य पदार्थ विक्रेत्याच्या गाडीवर लावण्यात आला आहे शिवाय या विक्रेत्यांवर कारवाई झाल्यास 8 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर डाऊन काशी एक्स्प्रेस रोखण्यासह 9 रोजी दुपारी 1 वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्स्प्रेस रोखण्यासह विभागातही 23 रोजी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा जगन सोनवणे यांनी दिला आहे.