अनधिकृत शाळांवर महापालिका करणार कारवाई

0

अधिनियमात जबर दंड आकारण्याची तरतूद

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 18 अनधिकृत शाळा असून या शाळांवर पालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. शाळा चालकांना नोटीसा देऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. तसेच शहरात आणखीन अनधिकृत शाळा आहेत का याचे पन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता अशा अनधिकृत शाळांकडून जबर दंड आकारण्याची तरतूद राज्य सरकारने पारित केलेल्या अधिनियमात केली आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा असेल, असा अंदाज होता. मात्र, या अधिनियमातील दंडाच्या तरतुदीचा कोणत्याही महापालिकेने वापरच न केल्याने ही तरतूद निष्प्रभ ठरली.

संस्था चालकांना महापालिकेतर्फे नोटीस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण 18 अनधिकृत शाळा आहेत. यामध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य सरकारची या शाळांमधील तुकड्यांना अधिकृत मान्यता नसताना देखील पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच राज्यभरात शेकडो अनधिकृत शाळा सर्रासपणे चालविल्या जात आहेत. या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना या शाळेच्या मान्यते विषयी माहिती नसल्याने अजाणतेपणामुळे हे पालक विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनधिकृतपणे शाळा चालविणार्‍या 18 संस्था चालकांना पालिका नोटीसा पाठविणार आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरात आणखीन अनधिकृत शाळा आहेत का याचे देखील सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.