नागरीकांचा आरोप : पत्रकारांना मज्जाव
वाघोली : वाघोलीसह पूर्व हवेली भागातील अनधिकृत सॉ मिलवर वन विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई दरम्यान माध्यमांना दूर ठेवण्यात आले. करण्यात आलेली कारवाई केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरीकांकडून होत आहे. त्यामुळे सदर कारवाईबाबत संशयाची सुई संबंधित अधिकार्यांकडे वळताना दिसून येत आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील वाघोली, भावडीसह अन्य गावातील अनधिकृत सॉ मिलवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. अनधिकृत चालू असलेल्या सॉ मिलला एक महिन्यापूर्वीच नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. वनविभागाने कारवाईचा इशारा दिल्याने सॉ मिलधाराकाने मशीन काढून टाकल्या होत्या. चालू कारवाई दरम्यान तेथील मशीन बसविण्याचा (पाया) बेस फक्त जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकण्यात आला. जेणेकरून कडक कारवाई चालली असल्याचे दिसून यईल, हा त्यामागील उद्देश असल्याचे दिसून येते. कारवाई चालू असताना पत्रकारांना फोटो व व्हिडिओ घेण्यास मज्जाव करण्यात आला. पत्रकारांना माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात आल्यामुळे कारवाईमध्ये पाणी मुरत असल्याची साशंता निर्माण झाली आहे.
परवान्यासाठी अर्ज केलेल्यांना वगळले
कारवाई पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी माहिती देऊ असे सांगून संबधित अधिकार्यांनी वेळ मारून नेली. ज्या लोकांनी मिलच्या परवान्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना कारवाईमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मिळाली. खरे तर अनेक वर्षापासून अनधिकृत सॉ मिल चालू असताना त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना या कारवाईमधून वगळण्यात आले. झालेल्या कारवाईमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. जे. गायकवाड, दीपक पवार, वायकर यांनी केली. आठ मिलवर कारवाई करण्यात आली असल्याचे व्ही. जे. गायकवाड यांनी सांगितले आणि अजूनही कारवाई चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.