अनधिकृत हॉटेलचा धंदा तेजीत

0

देहूरोड । मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोझेज या रेस्टॉरंट आणि पबमध्ये आगीच्या घटनेत चौदा निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेमुळे ऐन थर्टीफस्टच्या तोंडावर हॉटेल आणि बारच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परवानाधारक हॉटेलांपेक्षा अधिक गर्दी व खुलेआम व्यवसाय करणार्‍या विनापरवाना हॉटेलांच्या सुरक्षेचे काय, असे विचारण्याची वेळ आली आहे. किवळे परिसरात अशाप्रकारे विनापरवाना मद्यविक्री करणार्‍या हॉटेलांची सध्या चांगलीच चलती आहे. या हॉटेलांमध्ये थर्टीफस्टच्या मेजवान्या आणि पार्ट्यांची जय्यत तयारी सुरू आहे. पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका याकडे गांभिर्याने लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काळा पडदा आणि बांबूचे बांधकाम
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रात्री विविधरंगी रोषणाई, धुंद करणारे संगीत, मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचे कार्यक्रम अशा अनेक बाबी येथे आढळून येतात. ग्राहकांचा परिचय गुप्त ठेवण्यासाठी यातील काही हॉटेलांमध्ये मुंबईच्या घटनेत भस्मसात झालेल्या हॉटेलांप्रमाणेच काळा पडदा आणि बांबूचे बांधकाम तसेच आत मंद प्रकाश अशी व्यवस्था आहे. हा परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून बहुतांशी हॉटेलांना पालिकेकडून बांधकाम परवानगी नसल्याची माहिती मिळाली आहे. मद्यविक्रीही विनापरवाना केली जात आहे. यासंदर्भात कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारीपासून पळ काढताना दिसतात. त्यामुळे या हॉटेलांवर आता कारवाई कोण करणार, किंबहुना संबंधित सरकारी यंत्रणा एखाद्या दुर्घटनेची तर प्रतिक्षा करीत नसेल ना असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिसांचे अभय, विनापरवाना मद्यविक्री
किवळे परिसरातील मुकाई चौक ते शिंदे पंप या रस्त्यावर तसेच किवळे पुलाजवळ आणि धर्मराज मंगल कार्यालय परिसर या भागातील अनेक हॉटेलमध्ये थर्टीफर्स्टनिमित्त दारू पार्ट्यांसाठी जय्यत तयारी सुरू आहे. यातील एक-दोन हॉटेलांचा अपवाद वगळल्यास सर्रास हॉटेलांमध्ये विनापरवाना मद्यविक्री केली जाते. राजरोस चालणार्‍या या धंद्यांना पोलिसांचेच अभय असल्याचा खुलासा काही हॉटेलचालकांनी केला आहे. वरपासून खालपर्यंत सगळ्यांनाच सांभाळतो, म्हणून तर टिच्चून धंदा करतो, अशा मग्रुर भाषेत काहीजण आपल्या या व्यवसायाचे समर्थन करताना दिसून आले.