महासभेत जाहिरात बाह्य धोरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वरदहस्ताने अनधिकृत होर्डिंग्ज चालकांचे पेव फुटले आहे. त्या अनधिकृत चालकांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होवून शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. सत्ताधारी भाजपाने महापालिका उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आकाशचिन्ह व परवाना विभागाने स्वतंत्र ‘बाह्य जाहिरात धोरण’ (जाहिरात होर्डिंग- 2018 आऊटडोअर अॅडव्हर्टाइजिंग पॉलिसी ) तयार केली. ते धोरण येत्या महासभेत (दि.20) प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. त्या धोरणात अनधिकृत होर्डिंग्ज चालकांवर पाचपट दंडात्मक कारवाई बडगा उगारण्यात येणार असल्याने त्याचे दाबे दणाणले आहेत. तसेच जाहिरात होर्डिंगसाठी यापुढे पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.
मुंबई प्रांतिक महापालिका कलम 244 व कलम 245 आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 या नियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग काम करीत आहे. सदर विभाग खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात होर्डिंग्जला परवानगी देण्याचे कामकाज करते. मात्र,यापुर्वी खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात होर्डिंगची स्वतंत्र असे जाहिरात धोरण तयार केलेले नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतंत्र ‘बाह्य जाहिरात धोरणाअंतर्गत शहराची क्षेत्र आणि रस्ते असे झोनिंग रचना तयार केलीय, विभागनिहाय झोनिंगमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. झोन ‘अ’ मध्ये विकसित आणि उच्च घनता विभागात सर्वाधिक जाहिराती क्षमता असलेली क्षेत्रे आहेत. त्यात मुख्य वाहुतक संक्रमण केंद्रे व प्रमुख रहिवासी स्थाने आहेत. झोन ‘ब’ मध्ये विकसनशील व्यापारी क्षेत्रात कमी वाहतुक घनता असणा-या उपनगरीय क्षेत्राचा अंतर्भाव आहे. झोन ‘क’ मध्ये मिश्र वापर विकास क्षेत्र व निवासी किरकोळ विकसित भाग असलेले मध्यम जाहिरात क्षमतेच्या क्षेत्राचा समावेश आहे. झोन ‘ड’ मध्ये किमान जाहिरात क्षमता आणि कमी वाहतुक घनता असलेल्या निवासी क्षेत्राचा समावेश आहे.
हे देखील वाचा
रस्तानिहाय झोनिंगमध्ये चार श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यात श्रेणी एक मध्ये वाकड ते मुकाई चौक, राजीव गांधी उड्डाणपुल ते डांगे चौक, हॅरीस ब्रीज ते निगडी भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते मोशी टोल नाका, आकुर्डी डी. वाय. पाटील कॉलेज ते मुकाई चौक, चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव, बिर्ला रूग्णालय ते भुमकर चौक, पिंपरी चौक ते काळेवाडी पुल, नाशिक फाटा ते साई चौक, जगताप डेअरी ते हिंजवडी आणि भुमकर चौक ते विनोदे वस्ती, हिंजवडी टप्पा दोन या रस्त्यांचा समावेश आहे.
श्रेणी दोन मध्ये डांगे चौक ते बास्केट पूल, लांडेवाडी ते बजाज मटेरियल गेट, कुदळवाडी चौक ते चिंचवड स्टेशन, वाल्हेकरवाडी ते बास्केट पूल, काळेवाडी पूल ते कस्पटे वस्ती चौक, एम्पायर इस्टेट पुलाचा शेवट ते काळेवाडीतील एम.एम. शाळा या रस्त्याचा समावेश आहे. श्रेणी तीन मध्ये दिघी ते आळंदी, डुडुळगाव ते चिखली, चिखली ते तळवडे, बो-हाडेवाडी – मार्केटयार्ड ते सीएनजी पंप रस्ता, जय गणेश साम्राज्य ते कृष्णानगर चौक, 16 नंबर ते वाकड या रस्तयांचा समावेश आहे. तर, श्रेणी चार मध्ये शहरातील इतर सर्व रस्त्यांचा समावेश केला आहे.
जाहिरातधारकाची ओळख पटण्याकरिता जाहिरातदार संस्थेने फलकाच्या रस्त्याकडील बाजूच्या खालील कोप-यात ठरवून दिलेल्या आकारात संस्थेचे नाव, पत्ता आणि परवाना क्रमांक नमुद करणे बंधनकारक आहे. परवाना संपण्याची मुदत महिना व वर्षे हे चिन्हांमध्ये लिहिणे आवश्यक राहणार आहे. अवैध व बेकायदा बाह्य जाहिरातींवर महापालिकेचे नियंत्रण राहील. अशा अवैध जाहिराती काढून टाकण्याचा, त्या नष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला राहणार आहे. याशिवाय असे उल्लंघन करणा-या व्यक्तींना दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शहरात काही भागात जाहिरात मुक्त किंवा ना जाहिरात क्षेत्र ठेवण्यात आले. महापालिकेची संवर्धन क्षेत्राची 50 मीटर बफर क्षेत्रासह हेरिट़ेज व पर्यटन ठिकाणी परवानगी देणार नाही. यामध्ये राष्ट्रीय उद्याने, जिल्हा स्तरांवर जंगले, ऐेतिहासिक वास्तू, स्मशानभूमी, दफनभूमी, जागतिक व राष्ट्रीय, स्थानिक ऐतिहासिक जागा, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार धार्मिकदृष्ट्या ठिकाणे जाहिरातीला परवानगी देण्यात येणार नाही.
तसेच नकारात्मक जाहिरात फलकांची सुची तयार केली असून त्या देखील जाहिरात लावता येणार नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत जाहिराती चाप बसणार असून महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने निश्चित मदत होणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. सदरील जाहिरात धोरणास अंतिम मान्यता घेण्यासाठी येत्या महापालिका सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आले आहे.