अन‘सोशल’ मीडिया!

0

सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे ट्रेंड अगदीच हिट होताना दिसताहेत. यामध्ये वैयक्तिक आनंदाच्या तसेच दुखाच्या गोष्टीपासून, माहितीचा प्रवाह असो अथवा सरकारविरोधी एखादे आंदोलन असो किंवा अनेक सामाजिक हिताची कार्ये ते एखाद्याच्या व्यक्ती अथवा समूहाची बदनामी इथपर्यंत अनेक गोष्टी केवळ सोशल मीडियावर चाललेल्या दिसून येत आहेत. अभिव्यक्त होण्याचे किंवा सुख-दुख व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे आपण पाहू शकतो. खरेतर सोशल मीडिया हा आपल्या वैयक्तिक पीआर आहे. गेल्या आठवड्यात तूर घ्या तूर, यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या ‘रडतात साले’च्या विरोधात साला दानवेचा ट्रेंड सोशल मीडियात तुफान चालला. अनेक सामाजिक उपक्रम जसे की, रक्तदान, अवयवदान यांसारखे अनेक उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप समर्पक पद्धतीने चालवले जातात. मात्र, हीच सोशल अर्थात सामाजिक असलेली मीडिया किती अन’सोशल’ आहे आणि अन‘सोशल’ असण्याचे रूप किती भयानक आहे, हे परवा एका चित्रपट निर्मात्याच्या आत्महत्येनंतर समोर आलेय.

ढोलताशे चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी फेसबुकवर एक मोठी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी पत्नीकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे. पत्नीने केलेल्या मानसिक छळाचे वर्णन करत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरदेखील प्रश्‍नचिन्ह उभे केले आहेत. अनेक कायदे हे महिलांच्या बाजूने असून, पुरुषांनाही महिलांकडून होणार्‍या छळाला सामोरे जावे लागते. ही बाब मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावी आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी. अनेकदा पोलिसांकडूनही महिलांचीच बाजू ऐकून घेतली जाते आणि महिला म्हणून त्यांना पडती बाजू मिळते. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा असेही तापकीर यांनी आपल्या सुसाइड पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या वॉलवर जाऊन त्यांची ती पोस्ट वाचली. पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना असे करू नका, असे म्हणत धीर देण्याचा आणि हा निर्णय न घेण्याचे सल्लेही दिले आहेत. मात्र, अनेकांचे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी अलविदा केला. त्यांनी वॉल चाळताना या घटनेत एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे त्यांनी सुसाइड नोट टाकल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांत दुसरी पोस्ट टाकून ‘काय मित्र आहेत. मी आता एक पोस्ट टाकली तर ती न वाचताच लाइक करताहेत. पोस्ट माहिती नसेल तर माझ्या प्रोफाइलला जाऊन पाहा’, अशी पोस्ट टाकली आणि फीलिंग अँग्री म्हणत राग व्यक्त केला आणि विष पिऊन जीवनयात्रा संपवली. अर्थात आत्महत्या करणे हा कुठल्याच गोष्टीवरील उपाय नाहीये. सोशल मीडियावर सत्यकथन करून न्यायालयीन लढाई लढूनदेखील यावर उपाययोजना होऊ शकली असती, तो भाग वेगळा. या पोस्टला हजारो लाइक, कमेंट आणि शेअर्स मिळालेत. याच कन्क्लुजन करायला पोस्टकर्ते आता इथे नाहीत.

गंभीर बाब अशी की, एखादा व्यक्ती स्वतःला संपवण्याची गोष्ट करतोय आणि तिथे लोकं लाइक करून फेसबुकची वॉल स्क्रोल करताहेत यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं? स्मार्टफोनवर लाइक आणि स्माइलीच्या ऑप्शनने सोशल मीडियाचा सीरियसनेस खूप कमी केला आहे, असं वाटतंच. फेसबुक स्मार्ट फोनवर येण्याआधी थोडीफार अशी अटॅचमेंट होती, पण आता नाही. फेसबुक कृत्रिम माध्यम होत चालले आहे. सपोर्ट सिस्टिम म्हणून फेसबुक वापरणे धोकादायक आहे. केवळ डॉक्युमेंटेशनचे माध्यम म्हणून त्याकडे पाहू शकतो. बर्‍याचवेळी प्रत्यक्ष समोर बोलणार्‍या व्यक्तीच्या मनात काय आहे, हे आपण सांगू शकत नाही तर इथे फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून काय सांगण्याच्या प्रयत्न केला जातोय याचा अचूक अंदाज कसा बांधणार? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. मागे बालाजी सुतार यांनी सांगितले होते की, आपण पोस्ट एका विशिष्ट हेतूने टाकतात, पण वेगवेगळे वाचक त्याचे भलतेच अर्थ काढतात. कोणाला गंभीर विधान हास्यास्पद वाटते (उपरोधिक वाटल्याने म्हणा किंवा इतर काही कारणाने) तर कोणी विनोदी लेखन गांभीर्याने घेतात. अर्थात तापकीर यांनी ही पोस्ट टाकल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात प्रयत्न करणारेदेखील अनेकजण असतील, यात दुमत नाही. एव्हाना ते प्रयत्न केलेही गेले. मात्र, ते तापकीरांचा जीव मात्र वाचवू शकले नाहीत.

पत्रकार महेश विचारे यांनी यावर एक उत्तम प्रतिक्रिया दिलीय. तापकीर यांनी आत्महत्या करताना ते पूर्ण शुद्धीत होते हे त्यांनी केलेल्या पोस्टवरून लक्षात येते. त्यांच्या मनात आपल्या पत्नीविषयी जे काय होते, ते त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. खरे तर आत्महत्या करण्यापेक्षा याच सगळ्या गोष्टी त्यांनी अशाही लिहून फेसबुकवर टाकल्या असत्या किंवा आपल्या जवळच्या लोकांना कळवल्या असत्या, अगदी पोलिसांकडेही तक्रार केली असती तरी चालण्यासारखे होते. आत्महत्येचे त्यांचे पाऊल हे सर्वप्रथम अत्यंत चुकीचे आहे. दुसरी गोष्ट होती त्यांच्या फेसबुक मित्रांनी ती पोस्ट लाइक करण्याची. या दोन्ही घटनांवरून एकच स्पष्ट होते ते म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारखी माध्यमे आपण कशी वापरायची, कसा त्यांचा उत्तम उपयोग करता येईल याचे आपल्याला भान राहिलेले नाही. जर आत्महत्या करतो आहोत असे सांगण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होत असेल, तर मग मनात असलेली तीच वेदना न मरता जाहीर करण्याचा प्रयत्न का केला गेला नाही? तीच गोष्ट लाइक करणार्‍यांनीही ती न वाचताच त्याला लाइक करणे किंवा केवळ त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे हेदेखील चुकीचेच. सर्वप्रथम या प्रकरणात पोलिसांना कळवणे आवश्यक होते, असो. जे झाले ते दोन्ही बाजूंनी चुकीचेच होते. ही माध्यमे वापरण्याविषयी अनेक संस्था प्रबोधन करतात. घराघरांतही ज्यांना या माध्यमाच्या योग्य वापराविषयी कळते, त्यांनी सर्वांना त्याबाबत सावध करणे, त्यांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा अगदी स्वतःच्या मृत्यूचा व्हिडियो बनवूनदेखील आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. सोशल मीडियावर अमुक केल्याने आपल्याला 100 टक्के न्याय मिळेलच ही भावनाच मुळात चुकीची आहे. या प्रकारामुळे नाहक जीव मात्र गमवावा लागतोे. मात्र, भयावह सत्य आहे. सोशल मीडिया अभ्यासक सुनील गजघोष म्हणतात, सोशल मीडियावर आपल्याला आपण एक मस्त आयुष्य जगतोय याचे सुंदर चित्र लोकांना दाखवायचे असते. अर्थात हे एका दृष्टीने फायदेशीर असले, तरी दुसरी बाजू भीषण आहे. आपण लाइक व पॉझिटिव्ह कमेंट्स मिळाल्या तर खूश होतो. यामुळे सतत लाइक व पॉझिटिव्ह कमेंट्स मिळण्याची सवय लागते. फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स साठीच काहीतरी लिहीत जातो. यात आपण खूप वेळ वाया घालवतो. मात्र, यामुळे आपल्या वास्तविक आयुष्याची परिस्थिती बदलत नाही.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत फोनचे ’नोटिफिकेशन’ बघत असतो. आता एक मात्र नक्की की, आपल्याला सोशल मीडिया वापरताना अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. सोशल मीडिया ही एक प्रकारची आपल्या वेळेची खूप मोठी गुंतवणूक आहे, असे गजघोष म्हणतात. अनेक लोकं असतात जी वैयक्तिक आयुष्यात फार टेन्शनमध्ये असतात. मात्र, सोशल मीडियावर आल्यानंतर जगात त्यांच्यापेक्षा सुखी कुणीच नाही असे भासवतात. सोशल मीडिया हा एक मास मीडिया आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक लेव्हलवर अंतर्मुख होऊन यावर विचार करणे आवश्यक आहे.