क्रिकेटच्या मैदानात सध्या मिताली राज हिने धावांचा विक्रम प्रस्थापित करून लौकिक मिळवला असताना दुसरीकडे पुरुषांच्या संघाबाबत सुरू असलेल्या घडामोडी या वादग्रस्त ठरल्या आहेत. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आल्यानंतर साहजिकच मातब्बर खेळाडूंचा भाव वधारला. त्यांच्या जनतेतील प्रतिमेचा उपयोग करून विविध कंपन्यांनी आपापली उत्पादने विकली. यातून खेळाडूंना रग्गड पैसा मिळाला तर कंपन्यांचेही उखळ पांढरे झाले. अर्थात बीसीसीआयने ही बाब हेरून दिग्गज खेळाडूंचे हवे ते लाड पुरवण्यास प्रारंभ केला. आता हा सगळा प्रकार किती पुढे गेलाय याची जाणीव प्रशिक्षकपदाच्या निवडीतून दिसून आली आहे. खरं तर कोणत्याही क्रिकेट संघाच्या यशात त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते.
फुटबॉलच्या खेळाप्रमाणे क्रिकेटच्या प्रशिक्षकाला अद्यापही वलय नसले, तरी हे एक अतिशय जबाबदारीचे आणि अर्थातच प्रतिष्ठेचे पद नक्कीच आहे. खेळाडू मैदानावर खेळत असले, तरी एकंदरीतच वैयक्तिक आणि सांघिक रणनीती आखण्यात कोचचा सर्वात मोठा वाटा असतो. याचमुळे कोणत्याही संघाच्या कामगिरीला थेट त्यालाच जबाबदार धरण्यात येते. अर्थात कर्णधारपदाइतकाच कोणत्याही संघाचा कोच हा महत्त्वाचा असतो. याचा विचार करता भारतीय क्रिकेट संघाला त्याच तोलामोलाचा प्रशिक्षक मिळावा, ही अपेक्षा गैर नाही आणि यात अलीकडच्या कामगिरीचा विचार केला असता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अपवाद वगळता भारतीय संघाची कामगिरी चांगली होत असताना अनिल कुंबळे यांनी आपले पद सोडण्याचा घेतलेला निर्णय हा आश्चर्यकारक आहे आणि यानंतरचा घटनाक्रम पाहता यात नेमके काय पाणी मुरत आहे? याची जाणीव क्रिकेट रसिकांना झाली आहे. खरं तर प्रशिक्षकाने खेळाडूंसोबत मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, हे अपेक्षित आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे खेळाडूंना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास काय होते हे ग्रेग चॅपेलच्या उदाहरणावरून आपल्यासमोर आहेच. खेळाडूंच्या नावाला असणार्या वलयापेक्षा त्याच्या प्रत्यक्ष कामगिरीला प्राधान्य देण्याचे धोरण चॅपेल यांनी अमलात आणल्यानंतर काय हलकल्लोळ उडाला या बाबी सर्व क्रिकेट रसिकांना ज्ञात आहेत. ग्रेग यांनी सर्वात पहिल्यांदा वलयांकित खेळाडूंना वेसण घालण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला होता. यानंतर गत सुमारे एक दशकात अनेक बदल झाले आहेत. अगदी आयपीएलच्या नावाखाली बीसीसीआयनेच खेळाडूंच्या वलयाच्या लाभ करून घेण्यासाठी काय-काय करून घेतले हे सर्व आपल्यासमोर आहेच. क्रिकेटमधील हा चंगळवाद आता चरमोत्कर्षाकडे पोहोचल्याचे अलीकडच्या घटनांनी अधोरेखित केले आहे. क्रिकेटच्या संघाची कामगिरी समाधानकारक असून, प्रशिक्षक स्वत: एक महान खेळाडू असताना त्यांना ज्या पद्धतीने घालवण्यात आले तो प्रकार संशयास्पद असाच आहे. यातच तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली या दिग्गज त्रिकुटाने ज्या पद्धतीने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची तळी उचलून धरली तो सर्व प्रकार अनेक प्रकारच्या प्रश्नांना उपस्थित करणारा ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे काही जणांचे चरण्याचे कुरण बनल्याचा आरोप वारंवार होत असतो. यातील अनेक गैरप्रकार आधीदेखील अधोरेखित झाले आहेत. याचमुळे लोढा समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून याला चाप लावण्याचे प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. तथापि, जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक म्हणून ख्यात असणार्या बीसीसीआयच्या कारभारातील अनेक त्रुटी साधण्यात निश्चितच अपयश आले आहे. कोणतेही कारण नसताना अनिल कुंबळे यांना हटवून त्यांच्या जागी रवी शास्त्री यांची झालेली एन्ट्री ही याचाच परिपाक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या स्थित्यंतराचा कालखंड सुरू आहे.
धोनीकडून विराट कोहलीकडे संघाची सूत्रे आली असून, साहजिकच त्याच्या कलाने वागण्याचा बीसीसीआयचा पवित्रा आपण एक वेळ समजू शकतो. मात्र, या गदारोळात नाहक कुंबळेसारख्या दिग्गजाच्या झालेल्या उपमर्दाचे कुणी समर्थन करू शकणार नाही. आता शास्त्रींच्या जोडीला द्रविड आणि झहीर यांच्या रूपाने अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी नवीन प्रशिक्षक नेमण्याचा प्रकारदेखील नव्यानेच करण्यात आला आहे. पण, नेमणुका जाहीर झाल्यावर जे काही समोर येते त्याचा भारतीय संघावर किती परिणाम याचा विचार कोणच करत नाही, असे वाटते. प्रशिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यावर हा माझा, हा तुझा असा मैदानाबाहेर खेळ रंगला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला को असलेल्या माणसाचा पत्ता कापण्याचे राजकारण खेळले जात आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय संघात स्थित्यंतर घडत आहे. संघातील अनेक खेळाडू नवीन आहे. पुढच्या काळात हेच खेळाडू बीसीसीआयची धुरा वाहणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आणि संघावर काही वाईट परिणाम होऊ नये, भविष्यात त्यांची कामगिरी चांगली व्हावी, हीच अपेक्षा. अन्यथा मुख्य प्रशिक्षकाचे अधिकार मर्यादित करण्यासाठी वा निवृत्त खेळाडूंच्या सोयीसाठी जर हे होत असेल तर ही बाब अजूनच गंभीर मानावी लागेल.