अनाधिकृत बांधकामाविरोधात कृष्णा गिदींचे उपोषण

0

नादगांव : मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळी बांधवांच्या जागेवर अनाधिकृत बांधकाम करणार्याय त्याच गावातील हरिदास बाणकोटकर यांच्याविरोधात महालक्ष्मी मच्छिमार वि.का.स. सह-सोसायटीचे सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य कुष्णा गिदी मुरुड तहसिल कार्यालयासमोर 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजता उपोषणास बसणार आहेत. त्या उपोषणास संस्थेचे मच्छिमार सभासद हे ही सहभागी होणार आहेत. शासनाने कोळी बांधवांसाठी मासेमारी, नौकांची दुरस्ती व देखभाल, मासळी सुकविणे, जाळी दुरस्ती, पावसाळी नौका शाकारणे व साहित्यांचे संरक्षण आदि कामांसाठी दिलेल्या जागेत हरिदास बाणकोटकर यांनी अनधिकूत झोपडी बांधली. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी त्यांना समजाविले मात्र कोणालाही न जुमानता ग्रामस्थांच्या विरोधात खोटया तक्रारी दाखल केल्या. मात्र कारवाई होत नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे ग्रमस्थांनी सांगितले.

शासनाच्या नोटीसांना केराची टोपली
ग्रामस्थांनी संबंधित शासकीय विभागाशी संपर्क करुन हरिदास बाणकोटकर यांच्या विरोधात निवेदने दिली. महसुल विभाग, राजपुरी ग्रामपंचायत, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मेरिटाईम बोर्ड आदि विभागाने चौकशी करुन हरिदास बाणकोटकर यांची अनधिकृत झोपडी हटविण्याचे आदेश दिले होते. बाणकोटकर यांनी वेळोवेळी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व शासनाच्या नोटीसांना केराची टोपली दाखविली. तत्कालीन बंदर अधिकारी -बारापत्रे यांनी त्यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. मात्रा अधिकार्यांरनाही दमदाटी तसेच स्वत:च्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत असल्याने आजमितीस त्याच्या विरोधात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

कोळी बांधवांना हक्काच्या जागेचा वापर अशक्य
जानेवारीमध्ये हरिदास बाणकोटकर यांनी मंडळ अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवकांना झोपडी काढुन टाकण्याचे जबाबात लिहुन दिले होते. मात्र अद्यापही झोपडी हटविली नाही. त्यामुळे कोळी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जागेचा वापर करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा बघता अनाधिकृत झोपडी हटविण्यास मच्छिमार बांधवांनी कायदा हातात घ्यावा का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता याबाबत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास येत्या 5ऑगस्ट रोजी मच्छीमार सभासद व मी स्वतः उपोषणास बसणार असे संस्थेचे सभापती कृष्णा गिदी यांनी सांगितले.