प्रभाकर कला संगीत अकॅडमीचा उपक्रम
जळगाव- प्रभाकर कला संगीत अकॅडमी आयोजित ‘अनाहत’ या कार्यक्रमाद्वारे कथ्यक गुरु डॉ. अपर्णा भट-कासार व त्यांच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या कलाविष्कारामुळे रसिकांना शास्त्रीय नृत्याची अनुभूती लाभली.
भैय्यासाहेब गंधे सभागृहात शनिवार 1 रोजी सायंकाळी 6.30 वाजत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, संगीता राजे निंबाळकर, अपर्णा भट-कासार व किरण कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व श्रीकृष्ण पूजनाने शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी किशोर राजे निबांळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी गणेश, शिव, विष्णू, कृष्ण आणि गुरु या पंच देवतांना स्तुती सादर करुन वंदन करण्यात आले. तीन वेगवेगळ्या तालांमधील प्रस्तुती असलेले ‘त्रिवेणी’ नृत्य सादर केले. त्रितालातील काफी हा राग असलेले सरगम नृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. उपशास्त्रीय गायन शैलीत कजरी अर्थात श्रावण ऋतुचे वर्णन असणारी बंदीश ‘सावन की रुत आयी’ आणि ‘बरसन लागी बदरिया’ सादर करण्यात आले. कथ्यकचे वैशिष्ट्ये म्हणजे ठुमरी. बिदांदिन महाराज लिखीत ‘आवत श्याम लचक चलत’ आणि ‘मेरे मन भावना रे’ या गीतांना मोठी दाद लाभली. तमाम भारतीयांच्या परंपरेतील होळी म्हणजे कथ्थक मधील ‘होरी’ होय. अकॅडमीच्या विद्यार्थीनींनी ‘आज बिरज महो होरी हे रसिया’ या गीतावरील नृत्याद्वारे रंगाची जणू उधळण केली.
डॉ. अपर्णा भट-कासार यंानी ‘कहो जी तुम, कैसे बने हो’ आणि ‘छोड दे रे मोरी बैय्या’ या कृष्ण आणि राधा यांच्या उत्कट प्रेमाचे रंग दाखविणार्या बंदीश सादर केली. त्यांच्या नृत्य साधनेतील तपश्चर्येला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद देत वंदनच केले. जोग रागातील ‘तराना’ ने समारोप झाला.
तेजस मराठे, कपील शिंगाणे, प्रिया सायखेडे, संजय सोनवणे, कौशल कुमार, तनुजा महाजन , स्वाती पाटील धर्मेद्र चव्हाण, सुरेश जोशी, मायटी ब्रदर्सचे सहकारी संजय ससाणे, रुपेश महाजन, संजय बोरसे, राजेश भागवत, हर्षल भाटीया यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अकॅडमीची ज्येष्ठ विद्यार्थीनी कोमल चव्हाण हिने मनोगत तर शिवानी जोशी हिने परिचय करुन दिला. निवेदन डॉ. साधना पाटील व स्नेहलता परशुरामे यांनी केले. आभार ऋतुजा महाजन हीने मानले. प्रविणा कुलकर्णी (शहादा) यांनी अपर्णा भट-कासार याचा सत्कार केला. कार्यक्रमास माजी महापौर रमेशदादा जैन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, शिवशाहिर दादा नेवे, डॉ. राहुल मयुर, सी.ए.पल्लवी मयुर, आशा फाऊंडेशनचे गिरीष कुलकर्णी आदी मान्यवरांसह रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.