अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्महत्येचा प्रयत्न

0

सांगली : पोलिसांच्या थर्ड डिग्री मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत सांगली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आशीष कोथळे आणि अमित कोथळे यांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सांगली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.

वरिष्ठ अधिकार्‍यांची कुटुंबीयांशी चर्चा
अनिकेतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या सीआयडीवर कोथळे कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, हा तपास सीबीआयकडे द्या अशी मागणी केली. यावरूनच अनिकेतच्या भावांनी मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी अनिकेतची आई व पत्नीही उपस्थित होती. आत्महत्या करणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकान्त बोराटे, पोलिस रविंद्र शेळके यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

असे आहे अनिकेत कोथळे प्रकरण
अनिकेत कोथळेला एका चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान, त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मात्र, पोलिसांचे हे कृत्य समोर आल्यानंतर सांगलीसह संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांचीही बदली करण्यात आली आहे. एकूण 12 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.