अनिकेत शिंदे खून प्रकरणी आणखी तिघांना अटक

0

आळंदी येथून घेतले ताब्यात; दोनजण अद्याप फरार

चाकण । चाकण येथील शिवाजी विद्यालयात नववीमध्ये शिकणारा अनिकेत संदीप शिंदे (वय 16) याचा खून व ओंकार मनोज बिसनारे (वय 17) याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी फरार असलेल्या ओंकार झगडे, नितीन पंचरास, महेंद्र ससाणे (सर्व रा. चाकण) या तिघांना आळंदी येथून मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास अटक केली.

व्हॉट्स अपच्या वादातून 15 फेब्रुवारीला अनिकेतचा संग्राम दुर्ग येथे खून करण्यात आला होता. तसेच त्याचा मित्र ओंकार बिसनारे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी चाकण पोलिसांनी ओंकार झगडे, किरण धनवटे, तेजस रेपाळे, पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख, महेंद्र ससाणे, परेश गुंडानी या आठ जणांवर गुन्हे दाखल केले होते. ओंकार बिसणारे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेल्यांपैकी किरण धनवटे (वय 26), तेजस रेपाळे (वय 21) व प्रवीण गुंडानी (वय 26) यांना चाकण पोलिसांच्या पथकाने त्वरित अटक करण्यात आली होती.

तिघांना पोलिस कोठडी
शेलपिंपळगाव येथील खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून किरण, तेजस आणि प्रवीण यांना ताब्यात घेण्यात आले होते. या तिघांना 17 फेब्रुवारीला खेड न्यायालयात हजर केले असता दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. फरार असलेल्या ओंकार, नितीन, महेंद्र कैलास ससाणे या उर्वरित तीन जणांना पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे आळंदी येथून ताब्यात घेतले आहे. तर पप्पू धनवटे आणि वृषभ देशमुख हे अद्यापही फरारी आहेत. पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, मुश्ताक शेख, अनिल गोरड, नवनाथ खेडकर आदी पुढील तपास करीत आहेत.