मुंबई । चेंबूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत चालविण्यात येणार्या संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या आहारात पाल सापडल्याचा घटनेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उठले. विधानसभेत लक्षवेधी अंतर्गत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व सूचनांचा आदर करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी सदस्य सुजित मिचनेकर यांनी राज्यातील अनेक वसतिगृहात अशा तक्रारी येत असून कंत्राटदार हे उपकंत्राट देऊन काम चालवित असून यांची तपासणी कधी करणार व काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. यावर असे काही आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई करून लायसेन्स रद्द केले जातील असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
चेंबूरच्या वसतिगृहात पाल, काचेचे तुकडे , गोगलगाय आढळल्याने 150 विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. जेवणात पाल व तत्सम गोष्टी आढळून येऊनही कारवाई का होत नाही? याबाबत प्रश्न सरदार तारसिंह यांनी उपस्थित केला होता. यावर ना. कांबळे यांनी याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करून दोषी आढळेल त्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच अहवालात दोषी आढळल्यास एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.