अनियमित कर्जप्रकरणी सरकारपक्षातर्फे खुलासा दाखल

0

जळगाव । शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांनी जामनेर येथील पतसंस्थेतील अनियमित कर्जप्रकरणी दाखल गुन्ह्यात अतिरीक्त सत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी पोलिसांनी खुलासा सादर केला. या प्रकरणी 24 एप्रिल निर्णय होणार आहे. तसेच 24 तारखेला अंतिम युक्तीवाद करण्यात येणार आहे.

लेखा परीक्षणात बाब उघड
जैन यांनी सन 2010 मध्ये जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतून सुमारे दीड कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज कोणतेही तारण न ठेवता घेतले होते. तसेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जामनेर तालुक्यात पुरतेच मर्यादीत असताना जैन यांना कर्ज दिले होते. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक दीपक अनंत अट्रावलकर यांनी सन 2016-17 या वर्षाच्या केलेल्या लेखा परीक्षणात ही बाब उघड झाली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर जिल्हा उप निबंधकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 जुलै 2016 रोजी संस्थेचे पदाधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 35 जणांवर जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना जैन यांनी व्याजासह कर्जाची दोन कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळेस भरली होती. मात्र, अनियमित कर्जप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

जोरदार हरकत
या प्रकरणातील संशयित युवराज राजाराम मोरे, सीमा युवराजसिंह परदेशी, सुभाषचंद्र लोढा या सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या कर्जदारांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर पोलिसांनी शुक्रवारी खुलासा सादर केला. त्यात या गुन्ह्याचे तपास अजून अपूर्ण आहे, कर्जची रक्कमही पूर्ण भरलेली नाही त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळू नये अशी जोरदार हरकत सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी केली. या प्रकरणी 24 एप्रिल रोजी निर्णय होणार आहे.