अनिल अंबानी पगार घेणार नाहीत

0

मुंबई । रिलायन्स जिओने बाजारात पदार्पण केले आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये एकच धुमाकूळ घातला. रिलायन्स जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांना चांगलाच फटका बसल्याचे पहायला मिळाले. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमुळे त्यांचा भाऊ आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांनाही झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनीकडून 2017-18 या आर्थिक वर्षात एक रुपयाही पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापन मंडळानेसुद्धा 21 दिवसांचे वेतन घ्यायचे नाही असे ठरवले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सची कामगिरी सातत्याने घसरत गेली आहे. सोबतच कंपनीवर असलेले कर्ज लक्षात घेता खर्च कपातीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सला तब्बल 966 कोटींचा तोटा झाला होता. तर कंपनीवर सद्यःस्थितीला तब्बल 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज देणार्‍या बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सला परतफेड करण्यासाठी 7 महिन्यांची मुदत दिली आहे. म्हणजेच कंपनीला 45 हजार कोटी रुपयांची परतफेड यावर्षी डिसेंबरपर्यंत करायची आहे. कंपनीने डिसेंबरपर्यंत 60 टक्के कर्ज कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर कंपनीवर 20 हजार कोटींचे कर्ज राहिले.

कुमार मंगलम यांनाही फटका
अनिल अंबानी 2017-18 या आर्थिक वर्षात एक रुपयाही पगार घेणार नाहीत. तर यापूर्वी आयडिया सेल्युलर या कंपनीचे प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांच्या मानधनात मोठी कपात करण्यात आली होती. रिलायन्स जिओमुळेच टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. जिओच्या आक्रमक चालीमुळे अनेक टेलिकॉम कंपन्या अडचणीत आल्या आहेत. जिओ कंपनीकडून येणार्‍या नवनवीन योजनांमुळे या कंपन्यांची डोकेदुखी वाढली असून त्यांना या योजना चुकीच्या असल्याच्या तक्रारी ट्रायकडे
केल्या आहेत.