मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविल्याने संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदावर टांगती तलवार आहे. कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. त्याच्याशी झालेल्या करारास थेट मुदतवाद देण्याचे बीसीसीआयने टाळले आहे. प्रशिक्षक पदासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, सध्याचा प्रशिक्षक म्हणून निवड प्रक्रियेत त्याला थेट प्रवेश देण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बीसीसीआय भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी निविदा मागवत आहे. प्रशिक्षक पदासाठीची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहणार असून, अर्ज करणार्या उमेदवारांमधून सर्वोत्तम उमेदवाराची निवड बीसीसीआयची प्रशासकीय समिती सल्लागार समितीच्या मदतीने करणार आहे. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे. कुंबळे यांचा कार्यकाळ संपु्ष्टात येत असला तरी त्यांचा नव्या प्रशिक्षक नेमणुकीत थेट समावेश होणार आहे. कुंबळे यांना अर्ज करावा लागणार नाही. संघाच्या प्रशिक्षक पदाच्या नेमणुकीची प्रक्रिया प्रामाणिक आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासकीय समितीचा एक सदस्य यावर लक्ष ठेवून असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बीसीसीआयचा कुंबळेसोबत झालेला करार संपुष्टात येणार आहे. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त झाली आहे. मात्र असे असले तरी त्याच्याशी असलेल्या करारास थेट मुदतवाद देण्यास बीसीसीआय उत्सुक नसल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अनिल कुंबळेने स्वत:च्या आणि मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बीसीसीआय कुंबळेवर नाराज आहे. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजपाठोपाठ, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकली.