नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि बीसीसीआयच्या भुमिकेच्या वादात आता लोढा समितीने हस्तक्षेप केला असून बीसीसीआयला फटकारले आहे. प्रशिक्षक पद घेतल्यापासून कामगिरी केलेल्या अनिल कुंबळे यांच्याबरोबर थेट नव्यानेच करार करायला हवा होता. कुंबळेला दिली जाणारी वागणूक चुकीची असल्याचे सांगत नव्याने प्रशिक्षकपदांच्या मुलाखती कशाला? असा खडा सवाल करत लोढा समितीने झापून काढले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाची कार्यपद्धती मूर्खपणाची असल्याची टीका देखील केली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करायला हवे. ते निर्णयाचे पालन करीत नाहीत. आपल्या पदावर कायम आहेत. त्याच वेळी क्रिकेटपटू आणि मार्गदर्शकांबाबत करारातील छोटे मुद्दे मोठे करीत आहेत. नियमांचे पालन न करण्यासाठी वेगळाच कायदा हवा, असे लोढा समितीचे सचिव गोपाल संकरनारायण यांनी सांगितले आहे.
एका वर्षासाठी कोण पद स्वीकारणार?
प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागवल्याने संकरनारायण म्हणाले, कुंबळेला या प्रकारे वागणूक कशी देता? राष्ट्रीय मार्गदर्शकांना या प्रकारे वागतात. त्यांच्याबरोबर एका वर्षाचा करारच हास्यास्पद आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा प्रत्येक वर्षास घेणेच चुकीचे आहे. एका वर्षासाठी कोण पद स्वीकारणार आहे? मंडळाचे पदाधिकारी हे जाणूनबूजून करीत आहेत. राष्ट्रीय मार्गदर्शकांना काही तुकड्या-तुकड्यांनी दिले जात नाही. नवा करार नक्कीच एका वर्षाचा नको. कुंबळे खेळाडूंसाठी भांडत आहे. आयसीसीकडूनही त्यांना आता काही मिळत नाही. त्यामुळेच ते नाराज आहेत, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान अनिल कुंबळेचा प्रतिस्पर्धी म्हणून माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला अर्ज करण्यास भारतीय मंडळाच्या पदाधिकार्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.