अनिल गोटेंचा बोलवता धनी कोण?

0

मुंबई : आमदार अनिल गोटे यांनी दोन दिवस विधानपरिषद सभागृहाचा केलेल्या अपमानाचर पडसाद अखेर सभागृहात उमटले आणि विधान परिषद सभागृहाच्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून उपसभापतीकडून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पहिल्या दिवशी अनिल गोटेंच्या विधानपरिषद विरोधी वक्तव्यावर अंकुश म्हणून परिषद सभापतींनी निर्देश देऊन, ते कामकाजातून काढल्यावरही अनिल गोटे यांनी विधानसभेत पुन्हा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे हा फक्त एका सदस्याचा अपमान नसून संपूर्ण परिषद सभागृहाचा अपमान आहे. याविषयी जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्याला सदनात काम करण्याची इच्छा नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला.

आपला हक्कभंग झाला आहे असे सांगत अनिल गोटे यांनी आज पुन्हा परिषद सभागृहाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला. रामभाऊ म्हाळगी यांनी केलेल्या विधानांचे आधार घेत त्यांनी इंग्रज गेले तरी आपली संस्कृती परिषदेच्या रूपाने ठेवून गेले असे अनिल गोटे म्हणाले असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. असे असेल तर इथे उपस्थित असणारे सदस्य जनतेचा पैसा का वाया घालवत आहोत असा सवाल त्यांनी केला. हा अनिल गोटे सभागृहाचा ठरवून करत असलेला अपमान असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक मान्यवर इथे विविध क्षेत्रातून निवडून येतात त्यामुळे यांच्यासाठी असे विधान करणाऱ्या सदस्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी केली. भाजप नेते विनोद तावडे हे त्यावेळी विधानसभेत उपस्थिती असल्याने सभापतींनी त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर नाही म्हटले तरी आपल्या आजही अनेक बाबींवर ब्रिटीशांची छाप असल्याचे विनोद तावडे यांनी मान्य केले. सोबत आणील गोटे याना वरच्या सभागृहातील काही नेते खालच्या सभागृहातील काही बिले येउच देणार नाही असे म्हटल्याने त्यांनी असे विधान केले अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ केला. हा केवळ विरोधी पक्षाचा नाही अत्र इथे बसलेल्या प्रत्येक पक्षाच्या सदस्याचा अपमान असल्याची रोखठोक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. जर अशा प्रकारे दोन्ही सभागृहात वाद होणार असेल तर सभागृहात लोकशाही मजबूत कशी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोन्ही सभागृहांच्या संगनमताने अनेक महत्त्वाचे निर्णय पारित होत असल्याने हे संबंध बिघडू नयेत अशी इच्छा जनार्दन चांदुरकर यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेचे संसदेत असलेले महत्त्व सांगत त्यांनी अनिल गोटेवर हक्कभंग आणायला हवा अशी मागणी केली.

बोलवता धनी कोण ?
अनिल गोटे यांच्याशी इतक्या वर्षांत झालेल्या संवादात त्यांच्या बुद्धिमत्तेला झेपेल असे काम नाही असे सांगत किरण पावसकर यांनी त्यांना चिमटा काढला. त्यामुळे त्यांचा बोलावता धनी नेमका कोण आहे ? याला कोण चालना देत आहे याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जर हे सदनाच राहिले नाही तर तुम्ही आम्ही कुठे बोलणार ? हे प्रेअकर्ण गंभीर असून यावर सविस्तर चर्चेची मागणी त्यांनी केली. मात्र यानंतर झालेल्या गोंधळानंतर सभागृहाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन उपसभापतीनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

सरकारची भूमिका नाही
विरोधकांनी अनिल गोटे यांच्या वक्तव्यावरून घातलेल्या गोंधळावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. पक्षाला आणि सरकारला सभागृहाचे महत्त्व आणि जबाबदारी याची जाणीव आहे . अनेक चांगले निर्णय दोन्ही सभागृहाच्या संगनमताने देण्यात आले आहेत. अनिल गोटे यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे सांगत आपण मुख्यमंत्र्यांना त्यांना समाज देण्यासाठी विनंती करू अशी भूमिका स्पष्ट केली.