अनिल चौधरींची एन्ट्री दिग्गजांना ताप

0

भुसावळाचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी एरंडोल मतदार संघातील जनसंपर्क कमी करीत रावेर विधानसभा मतदारसंघात उडी घेतल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ विभागात असलेला जनसंपर्क व तरुण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, असे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या ते दररोज घेत असलेल्या भेटी-गाठींवरून दिसून येते तर चौधरींच्या जनसंपर्काने मात्र दिग्गजांचा मात्र भविष्यात ताप वाढेल, असे जाणकार बोलताना दिसून येतात.

एरंडोल ऐवजी रावेरला पसंती
सुरुवातीला एरंडोलमधून लढण्यासाठी इच्छूक असलेल्या अनिल चौधरी यांनी आपल्या व्यापक जनसंपर्काच्या बळावर कार्यकर्त्यांचे संगठण वाढवण्यासह एरंडोलमधील पाणीटंचाई पाहता टँकरची उपलब्धता तसेच दोन जनसंपर्क कार्यालये उघडली होती तर पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी येथे जनसंपर्क वाढवण्यासाठी भाजपातर्फे दोन प्रबळ दावेदार एरंडोल मतदारसंघातून निवडणूक लढतील, असे राजकीय दिग्गजांना वाटत असतानाच रस्सीखेच होवू नये म्हणून अनिल चौधरी यांनी एरंडोल-ऐवजी रावेर मतदारसंघाला प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे. एरंडोलमधून पारोळा नगराध्यक्ष करण पवार आता प्रबळ दावेदार ठरूक शकतात. भुसावळपासून मुळातच एरंडोल लांब असल्याने व त्या मानाने रावेर मतदारसंघ तापी नदी ओलांडताच सुरू होत असल्याने वेळेची बचत होते शिवाय 2009 मधील विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून इच्छूक असलेल्या चौधरींनी जनसंपर्क वाढवत येथून लढवण्यासाठी तयारी सुरू केली होती त्यामुळे त्यांचे मुळातच मोठे संघटन येथे आहे तर काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही. रावेर मतदारसंघातील तेली समाजाचे भुसावळातील असलेले नातेगाते व कार्यकर्त्यांचे संघटन पाहता चौधरी यांनी आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने सुरक्षित विधानसभा मतदारसंघात आपले वलय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

दरवेळी नवीन आमदारांचा पॅटर्न
रावेर विधानसभा मतदारसंघात ‘नवा भिडू, नवा राज’ या उक्तीचा काहीसा प्रत्यय मतदारांकडून लोकप्रतिनिधींना अनुभवयास मिळाला आहे. अपवाद केवळ माजी मंत्री स्व.मधुकरराव चौधरी यांच्या बाबतीत ठरला. विविध समाजाचे बलाबल पाहता येथे चाणाक्ष मतदारांनी गुजर समाजाचे राजाराम गणू महाजन, मराठा समाजाचे व भाजपाचे अरुण पाटील, लेवा पाटील समाजाचे शिरीष चौधरी, लेवा पाटील समाजाचे हरिभाऊ जावळे यांना आतापर्यंत संधी दिली आहे.

लेवा समाजाचे सर्वाधिक मतदान
रावेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार लेवा समाजाचे त्यानंतर मराठा, बौद्ध, मुस्लीम व ईतर समाजातील मतदारांचा समावेश आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची लेवा समाजावर घट्ट पकड आहे. मागील काळात रोहिणी खडसे-खेवलकर यांनीदेखील या विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते मात्र काही कारणास्तव त्या रिंगणात उतरलेल्या नाहीत.

नाथाभाऊंचा ‘आशीर्वाद’ ठरणार महत्त्वाचा
शिस्त हीच ओळख असलेल्या भाजपा पक्षातर्फे आगामी काळात रावेर विधानसभा मतदारसंघासाठी कुणाला तिकीट मिळते ? हे अद्याप सांगणे कठीण आहे तर पक्षश्रेष्ठी सांगतील त्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण मेहनत घेऊ, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. असे असलेतरी नाथाभाऊंचा आशीर्वाद ज्या उमेदवाराला असेल त्याच उमेदवाराचा निश्‍चितच विजय आहे, असे राजकीय समीक्षकांना वाटते. अर्थात अद्याप विधानसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांचा अवधी असल्याने अनेक स्थितंतरे वा राजकीय घडामोडी घडतील व प्रसंगी चित्रदेखील बदलू शकते, असेही बोलले जात आहे.

स्वबळावर लढल्याने आमदार जावळेंना संधी
गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली त्यामुळे राष्ट्रवादीच्या गफ्फार मलिक यांनी समाजाची मते घेतल्याने माजी आमदार शिरीष चौधरींचे मताधिक्य कमी झाल्याने आमदार हरिभाऊ जावळेंना संधी मिळाली तर आगामी निवडणुकीत नेमकी राजकीय स्थिती वा राजकारणाची दिशा नेमकी कोणत्या वळणावर असेल? त्यावरच उमेदवाराच्या जय-पराभावाची कारणीमिमांसा करणे योग्य ठरेल. माजी आमदार शिरीष चौधरींदेखील मतदारांशी दांडगा जनसंपर्क ठेवून असल्याने त्यांचेदेखील इच्छूक उमेदवाराला प्रबळ आव्हान असणार आहे हेदेखील तितकेच खरे !

– गणेश वाघ, भुसावळ
9021310269