अनिल चौधरींना उभे करण्यामागे भाजपातील अदृश्य शक्तींचा हात

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची खळबळजनक माहिती

जळगाव : रावेर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या विरोधात बंडखोर उमेदवार अनिल चौधरी यांना उभे करण्यात भाजपातीलच अदृश्य शक्तिंचा हात होता अशी खळबळजनक माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, रावेर मतदारसंघातील उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्यावर कुठलेही प्रकारचे आरोप नव्हते. असे असताना त्यांच्याविरोधात अनिल चौधरी यांना उभे करण्यामागे पक्षातीलच काही अदृश्य शक्तींचा हात होता. अनिल चौधरी यांनी ४४ हजाराहून अधिक मतदान घेतल्याने हरिभाऊंचा पराभव झाला असेही खडसे यांनी सांगितले.

मी स्वस्थ बसणारा नाही

मुक्ताईनगर मतदारसंघाबाबत बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारमुळे फटका बसला. जिल्ह्यात देखील भाजपचे संख्याबळ घटले. हे पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात ४० प्लसची घोषणा करण्यात आली होती. मात्र अवघ्या २१ जागा आम्हाला जिंकता आल्या. ॲंटीइंकंबंसीचा फटका आम्हाला बसला. तसेच काही ठिकाणी बंडखोरी झाली. त्याचाही परिणाम झाला. हेच चित्र राज्यातही दिसून आले. मुक्ताईनगरातील पराभवाची काढणे मी शोधत आहे. रोहिणी खडसे यांना उमेदवारी देउ नका असे मी पक्षाला सांगितले होते. यासंदर्भात मी माझ्या वरिष्ठ नेत्यांकडे म्हणणे मांडणार आहे . मी काही स्वस्थ बसणारा नाही असे सुचक विधानही एकनाथराव खडसे यांनी यावेळी केले.