अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते.