अनिल भोसले यांचे संचालक पद कायम

0

पुणे । शिवाजीराव भोसले सहकारी बँकेस स्वतःची जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांचे बँकेचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. या निर्णयाला सहकार आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. सहकार विभागाने सहकार कायद्यानुसार अनिल भोसले आणि रेश्मा भोसले यांचे संचालकपद रद्द केले होते. या विरूध्द भोसले दाम्पत्याने सहकार मंत्र्यांच्या कोर्टात आपिल केले आहे. यामुळे सहकार आयुक्तांनी संचालक पद रद्द केल्याच्या आदेशावर अंतिम निर्णय होईपर्यत स्थगिती दिली आहे.

शिवाजी राव भोसले सहकारी बँकेच्या कोथरूड आणि विश्रांतवाडी शाखेचा भाडे करार सहकार कायदा अंमलात येण्यापुर्वी करण्यात आले आहेत. परंतु सहकार कायद्यात झालेल्या बदलामुळे बँकेच्या उपरोक्त शाखेच्या जागा त्यांच्या चालू असलेल्या उत्तम व्यवसायामुळे बदलणे बँकेस योग्य होणार नाही. त्यामुळे याच जागेवर व्यवसाय चालू असल्याचे भोसले यांनी पत्रकाद्वारे कळवले.