मुंबई । शिवाजी पार्क जिमखाना आयोजित दहाव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे पुण्याचा तिसरा मानांकित अनिल मुंढे, मुंबईच्या अग्रमानांकित काजल कुमारी यांनी विजेते पद पटकाविले. अंतिम फेरीत पुण्याच्या अनिल मुंढे रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या झहिद अहमदचा 11-24, 25-10, 25-15 असा पराभव करून पहिल्या विजेतेपदासाठी असलेले 21 हजार रुपयांचे बक्षिस आणि चषक पटकावला. उपविजेता झहिद अहमदला रोख 11 हजार रूपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
अंतिम सामन्यातील पहिला गेममध्ये अप्रतिम शॉट व आक्रमक खेळ करत ठाण्याच्या झहिद अहमद सहाव्या बोर्डपर्यंत 12-11 अशी आघाडी घेत सातव्या आणि आठव्या बोर्डमध्ये 6 आणि 7 गुण मिळवून 25-11 असा जिकला. दुस़र्या गेममध्ये अनिल मुंढेने आक्रमक व बचावात्मक खेळाचे मिश्रण करत पाचव्या बोर्डपर्यत 24-10 अशी आघाडी घेत सहाव्या बोर्डमध्ये 1 गुण मिळवून 25-10 असा दुसरा गेम जिंकून 1-1 ने बरोबरी केली. निर्णायक तिस़र्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या अनिल मुंढेने सहाव्या बोर्डपर्यंत 24-11 गुणांनी आघाडी घेतली. नंतरच्या दोन बोर्डात 2 गुम मिळवून 25-15 असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱया क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या रियाज अकबर अलीने मुंबईच्याच फेडरेशन चषक विजेता मोहम्मद गुफरानवर रोमहर्षक दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत 25-23, 25-4 अशी मात केली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अनिल मुंढेने अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या रियाज अकबर अलीचा 25-4, 18-25, 25-12 असा पराभव करून कडवी झुंड मोडीत काढली. दुस़र्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या झहीद अहमदने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मुंबईच्याच मोहम्मद गुफरानचा 25-19, 15-25, 25-12 असा तीन गेम रंगलेल्या चुरशीच्या उत्कंठापूर्ण सामन्यात पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीमध्ये अग्रमानांकित मुंबईच्या काजल कुमारीने दुसर्या मानांकित माजी सार्क व राज्य विजेती मुंबईच्याच आयेशा मोहम्मदचा 25-14, 25-8 असा फडशा पाडत आपले वर्चस्व सिध्द करून 7500 रुपयांच्या रोख पारितोषीक व चषक याची मानकरी ठरली. उपविजेती आयेशा मोहम्मदला पाच हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तिस़र्या क्रमांकाच्या सामना पालघरच्या मिताली पिंपळेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याच्या मिनल लेलेची 13-25, 25-16, 26-6 अशी कडवी झुंज मोडीत काढली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या मिताली पिंपळेवर दोन गेम रंगलेल्या लढतीत 25-14, 25-8 अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुस़र्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या माजी राज्य व सार्क विजेती आयेशा मोहम्मदने सातव्या मानांकित ठाण्याच्या मिनल लेलेला 25-6, 25-7 असे नमवून अंतीम फेरी गाठली.