अनिल वाघ, हिना पटेल यांनी केली धाडसी कमांडो रॅपलिंग!

0

पिंपरी : महाराष्ट्राला लाभलेला विशाल सह्याद्री म्हणजे, निसर्गाची एक देणच…, या सह्याद्रीच्या कड्यावर म्हणजे हरिश्‍चंद्रगडावरून 900 फूट खोल कमांडो रॅपलिंग करण्याचा विक्रम महाराष्ट्राचे अनिल वाघ व गुजरातच्या हिना पटेल यांनी केला आहे. अनिल वाघ हे पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलात कार्यरत असून, हिना पटेल या गुजरात, अहमदाबाद येथे सरकारी रुग्णालयात परिचारीका आहेत. कोकण कड्यावर असे कमांडो रॅपलिंग आत्तापर्यंत कोणी केले नव्हते. त्यातही एका मुलीने कोकण कड्यावर अशी कमांडो रॅपलिंग करण्याची ही पहिलीच वेळ.

हिनाने घेतले प्रशिक्षण
अनिल वाघ यांनी हरिश्‍चंद्रगडावरून कमांडो रॅपलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या मोहिमेत त्यांना एका मुलीची साथ हवी होती. म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह गुजरातमध्येही या मोहिमेसाठी बोलणी केली. अहमदाबाद येथे सरकारी रुग्णालयात परिचारीकेचे काम करणार्‍या हिना पटेल या तरुणीने या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी ती महाराष्ट्रात आली. तिने वाघ यांच्याकडून कमांडो रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतले.

कोकणकडा हरिश्‍चंद्रगडाचे आकर्षण
कोकणकडा म्हणजे हरिश्‍चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परीघाचा वाटीसारखा अर्ध गोल आकाराचा काळा भिन्न, रौद्र भिन्न कोकणकडा. पायथ्यापासून त्याची उंची साधारणत: 4500 फूट. कड्याची सरळधार 1700 फूट. त्यात 180 किलो वजनाच्या दोरी, भारताचा 10 बाय 12 चा राष्ट्रध्वज, खाण्याचे सामान यासह गडावर चढण करत 13 लोकांची टीम 4 ते 5 तासात पोहचली. त्यानंतर खर्‍या अर्थाने अंगावर शहारा आणणारे कमांडो रॅपलिंग वाघ व पटेल यांनी सुरू केले. या दोघांनी कमरेला, पायाला दोर्‍या बांधून चक्क त्या कोकणकड्यावरून कमांडो रॅपलिंग म्हणेज उलटे लटकून उतरण्यास सुरुवात केली. सलग चार दिवसात म्हणजे 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत ही मोहीम पूर्ण झाली.

मोहिमेसाठी यांचे सहकार्य
या मोहिमेचा खर्चही फार मोठा होता. परंतु, हा सर्व खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला. तसेच ड्रिफ्टटर्स ट्रेकिंग क्लब शहापूर, मुंबईचे सदस्य यश जगे, प्रथमेश तेंडुलकर, अविनाश वाघमारे, शंतनू पिसाट, अक्षय शिंदे, सिद्धार्थ गायकवाड यांनी सहकार्य केले. तर फोटोशूट क्षीतिज भावसार याने केले. पारस पंचाल याने सर्व तांत्रिक जबाबदारी सांभाळली. महेश घनवट, विकी आनंदकर, विशाल खेतमाळीस, सावळा राम बादड, गोरख भांगरे व सुशील दुधाणे यांनी मोहीम यशस्वी होण्यास मदत केली.