वरणगावसह वाशिमच्या तक्रारदाराच्या इशार्याने प्रशासनात खळबळ
भुसावळ- वरणगाव येथील सुनील चौधरी यांच्या खूनाला नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही मारेकरी पकडले न गेल्याने कारवाईच्या मागणीसाठी मयताच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर वाशिमच्या तक्रारदाराच्या कुटुंबातील कुणालाही अनुकंपा तत्वावर नोकरी न मिळाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नऊ महिन्यानंतर खुनातील मारेकरी मोकाट
वरणगावच्या सपना सुनील चौधरी यांच्या तक्रारीनुसार त्यांचा पतीचा नऊ महिन्यांपूर्वी खुन झाला होता. ज्या संशयीतांनी त्यांच्या पतीला घराबाहेर नेले त्याचे सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर देवूनही वरणगावच्या प्रभारी पोलिस अधिकार्यांनी दखल घेतली नाही शिवाय तपास एलसीबीकडे गेल्यानंतरही तपास शून्य आहे. 10 ऑगस्टपर्यंत आरोपी पकडल ने गेल्यास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकड तक्रार अर्जाद्वारे केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अनुकंपा तत्वावर मिळाली नाही नोकरी
बलखंडे नालंदा नगर, सिव्हील लाईन, वाशिमचे तक्रारदार राजेश उर्फ सतीश कातबराव यांनी भुसावळ डीआरएम यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेली नाही. न्यायाच्या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी पत्नी, मुलगा, व मुलगीसह त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. संबंधित वरीष्ठ अधिकार्यांनी भेट न दिल्यास हेच इशारा पत्र समजावे, असेही कातबराव यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.