अनुदानाअभावी लाभार्थींचा रावेर पालिकेत गोंधळ

0

पंतप्रधान आवास योजनेच्या एक कोटी 88 लाखांच्या अनुदानापासून 124 लाभार्थी वंचित

रावेर- पंतप्रधान आवास योजनेच्या 124 लाभार्थींचे तब्बल एक कोटी 88 लाखांचे अनुदान रखडल्याने संतप्त लाभार्थींना गुरुवारी रावेर नगरपालिका गाठत तीव्र संताप करीत गोंधळ घातला. अखेर या योजनेचे बांधकाम अभियंता ललित महाजन यांनी घरकुलाच्या महिला लाभार्थींची समजूत घालत राज्य सरकारची पूर्ण रक्कम आली असून केंद्र सरकारची पूर्ण रक्कम बाकी असल्याचे आलेल्या महिलांना सांगितले. सर्व महिलांनी पालिकेत नगरपालिका प्रशासन अधिकारी तडवी निवेदन देऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.

अनुदान प्राप्त होताच वितरण
घरकुलाच्या लाभार्थींना अनुदान अद्याप शासनाकडून नगरपालिकेला प्राप्त झालेले नसल्याचे सांगून अनुदान मिळताच ते वितरीत केले जाईल, असे गटनेते आसीफ मोहोम्मद यांनी सांगितले मात्र यामुळे लाभार्थींची समाधान झाले नाही व घोषणाबाजी करीत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी घरासाठी मंगळसूत्र, दागिने गहाण ठेवल्याची भावना लताबाई महाजन यांनी व्यक्त केली. त्यांनी त्यांचे राहते घर पाडून त्या जागेवर घरकुल बांधत असल्याचे सांगत एक वर्षापासून भाड्याच्या घरात राहत असून महिन्याला तीन हजार रुपया प्रमाणे आतापर्यंत 36 हजार रुपये भाडे भरल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी महेंद्र गजरे, गणेश शिंदे, लताबाई महाजन, सुसाबाई महाजन, भारतीबाई महाजन, बेबाबाई मानकर, दुर्गाबाई बारी, गीताबाई महाजन, शोभाबाई शिंदे, पुष्पाबाई महाजन, प्रतिभाबाई माळी, मनीषा महाजन, शाहनूर शेख, हकीना शेख, शमीम शेख यांच्यासह रावेर शहरातील घरकुल लाभार्थी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

घरकुलासंदर्भात माढाला पत्रव्यवहार करणार
घरकुल आवास योजनेसंदर्भात पालिकेला लवकरात-लवकर उर्वरीत अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून केंद्र सरकारचा निधी मिळल्यावरच या लाभार्थींना अनुदान मिळणार असल्याचे नगरपालिकेचे बांधकाम अभियंता ललित महाजन यांनी सांगितले.