इंदापूर : ज्या शेतकर्यांनी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 अखेर कृषि उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्री केलेली आहे, अशा सर्व शेतकर्यांनी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीकडे प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान मिळण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे.
शेतकर्यांना जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत हे अनुदान मिळणार आहे. सदरचे अर्ज शेतकर्यांनी 15 जानेवारी 2019 पर्यंत करावयाचे आहेत. कांदा अनुदान मागणीचे अर्ज कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर कार्यालयात विनामूल्य मिळणार आहेत. सदर अर्जासोबत कांदा विक्री पट्ट्यांची छायांकीत प्रत, कांदा पिकाची नोंद असलेला चालू तारखेचा सातबारा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेच्या पास बुकाची पहिल्या पानांची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी. ज्या प्रकरणात सातबाराचा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या किंवा कुटुंबातील अन्य सदस्याच्या नावी आहे, अशा प्रकरणात वडील, मुलगा अथवा कुटुंबातील सदस्याने सहमतीने विहीत नमुन्यातील शपथपत्र सादर केल्यानंतर सातबारा उतारा ज्यांच्या नावे आहे त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे. शपथ पत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे बाजार समितीचे सचिव जिवन फडतरे यांनी सांगितले. मुदतीत अर्ज सादर केले नाहीत तर अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.