ओल्या दुष्काळाचे शेतकर्यांना ९२ टक्के अनुदान वाटप
जळगाव – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी प्राप्त झालेल्या अनुदानाचे वितरण करण्यात दिरंगाई केल्याने चार तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या चारही तहसीलदारांकडुन खुलासा मागविण्यात आला असुन खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 6 लाखाहून अधिक हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून 643 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 6 लाख 30 हजार 871 शेतकर्यांसाठी 179 कोटी 98 लाख 1 हजार रूपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले. या प्राप्त झालेल्या अनुदानाचे तहसीलदारांना तातडीने वितरण करण्यात येऊन ते शेतकर्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी अनुदान वाटपाला सुरवात केली. या अनुदान वाटपाचा दैनंदीन अहवाल प्रशासनाने तहसीलदारांकडुन मागविला होता. अहवालानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 44 हजार 852 शेतकर्यांना 166 कोटी 17 लाख 85 हजार 335 रूपये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. एकूण 92. 62 टक्के अनुदान वाटप झाले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
चार तालुक्यात कमी वाटप
जिल्ह्यातील भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील शेतकर्यांना अनुदानाचे 100 टक्के वितरण करण्यात आले आहे. तर एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा या चार तालुक्यातील तहसीलदारांनी अनुदान वाटपात दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या आदेशान्वये चारही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असुन त्यांच्याकडुन खुलासा देखिल मागविण्यात आला आहे.
जळगाव – 99.70 टक्के, जामनेर – 99.98, एरंडोल – 60.08, धरणगाव – 98.92, भुसावळ – 100, बोदवड – 100, मुक्ताईनगर – 100, यावल – 99.99, रावेर – 100, पाचोरा – 74.90, भडगाव – 74.54, पारोळा – 81.19, चाळीसगाव – 100, अमळनेर – 100, चोपडा – 100 टक्के अनुदान वाटप झाले आहे.