अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी

0

शहादा । सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनाची त्वरीत दखल घेत तळोदयाचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय क्रं. 1 व 2 यांना भेट दिली असता, तेथे फक्त एकच कर्मचारी आढळून आला आणि बाकी सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे अनुपस्थित कर्मचार्‍यांना नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात येणार आहे….याबाबत सविस्तर वृत्त असे की, आदिवासी जनसेवा संघ महिला आघाडीचे मालती वळवी, अंजू पाडवी आणि आ. रा. अधिकार मंचचे अध्यक्ष दयानंद चव्हाण, जगन मोरे, चुनिलाल (सुनिल) पाडवी, बहादुर ठाकरे, अर्जुन मोरे, राजेंद्र चव्हाण, दिलवरसिंग खर्डे, जयमंगल पाडवी, कुवरसिंग वळवी आदी कार्यकर्ते तळोदयातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे काल कामानिमित्ताने गेले असता, त्या कार्यालयात एक ही कर्मचारी त्यांना आढळून आला नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला, त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आणि सदर अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन दिले.

कामकाजाच्या फाईल्स उघड्यावर
तहसिलदार योगेश चंद्रे व तलाठी यांनी लागलीच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय क्रं.1 व 2 यांना भेट दिली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं. 1 चा कार्यालयामध्ये कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी आढळून आला नाही, तसेच कार्यालयाचे सर्व दरवाजे उघडेच होते आणि कामकाजाच्या फाईल्स/नस्ती वरती ठेवलेल्या आढळून आल्यात. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं. 2 चा कार्यालयामध्ये फक्त शिपाई डी. ए. इंगोले हेच उपस्थित होते. शिपाई इंगोले यांना याबाबत अधिक विचारले असता, त्यांनी सर्व अधिकारी साईट वर गेले असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं. 1 च्या सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिक मनीषा पवार यांना याबाबत दूरध्वनीवरुन विचारले असता, जेवण करण्यासाठी गेलो आहोत असे सांगितले आणि शासकीय जेवणाची सुट्टीची वेळ दु 1 ते 3 आहे असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय क्रं. 1 व 2 येथील अधिकारी व कर्मचारी हे नेहमीच अनुपस्थित राहत असतात, परंतु त्याचा प्रत्यय या घटनेमुळे आला.

सदर अनुपस्थित कर्मचार्‍यांना नोटीस पाठविण्यात येणार असून त्यांचा कडून खुलासा मागविण्यात येणार आहे आणि जर अनुपस्थित कर्मचार्‍यांनी व्यवस्थित खुलासा केला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शासकीय कामाचा वेळेत कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचार्‍यांनी कामचुकारपणा किंवा हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– योगेश चंद्रे. तहसीलदार, तळोदा