अनुभवाचा उपयोग रेल्वेच्या विकासासाठी करावा

0

भुसावळ । आयुष्यभर आपण ज्याठिकाणी काम करतो, त्यामुळे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासह आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करीत असतात. यादरम्यान कर्मचार्‍यांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असते. त्यामुळे कामावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्तांनी त्यांचा अनुभव रेल्वेच्या कामासाठी वापरल्यास त्याचा चांगला फायदा होईल, असे आवाहन डिआरएम आर.के. यादव यांनी केले.

सेवानिवृत्तांना अधिक सुविधा देण्यावर भर राहणार
यावेळी व्यासपीठावर बी.एम.नन्नवरे, असोसिएशनचे अध्यक्ष पी.जे. जावळे, व्ही.के. समाधिया, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव एस. बी. पाटील उपस्थित होते. प्रसंगी अनेक सेवानिवृत्तांनी असोसिएशनला आर्थिक सहकार्य केले. सेवानिवृत्तांची कोणतीही समस्या असली तरी ती तातडीने सोडविण्यात येईल विशेष करुन पेन्शनबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल. आरोग्याचे प्रश्नही सोडविण्यात येतील. प्रशासनाला सेवानिवृत्तांना अधिक सुविधा देण्यावर भर राहील. सेवानिवृत्तांनी रेल्वेच्या कामकाजात सुधारणा करण्याबाबत सूचना कराव्या असेही आवाहन डीआरएम यादव यांनी केले.

प्रकरणे मार्गी लावणार
शनिवार 17 रोजी रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. असोसिएशनचे पेट्रन एस. ओ. बर्‍हाटे अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी सीआरएमएसचे विभागीय अध्यक्ष व्ही.के. समाधिया यांनी मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.तुषाबा शिंदे यांनी बोलताना सांगितले की, डीआरएम यादव यांच्या सूचनेनुसार सेवानिवृत्तांच्या पेन्शन बाबतची प्रकरणे तातडीने मार्गी लावली जात आहेत. दोन वर्षात 450 प्रकरण होती ती आता 90 राहीली आहेत. ती पंधरा दिवसात पूर्ण होतील. असे सांगितले.