अनुभूतीला प्रगल्भ करतात कलात्मक चित्रपट

0

जळगाव। चित्रपटांच्या रसग्रहणाची क्षमता लयास गेली असून जर शाळा, महाविद्यालयांमध्ये असे चांगले-अभिनव उपक्रम राबविले गेले तर खर्‍या अर्थाने नव्या पिढीला चित्रपटांचा आनंद घेता येईल, त्यांच्यात सामाजिक जाण व आत्मभान विकसित होईल. असे मत केसीई सोसायटीचे सदस्य व प्रसिद्ध उद्योजक हरीशभाई मिलवानी यांनी मु.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नव्याने आरंभ केलेल्या एम.जे.फिल्म अ‍ॅप्रिसिएशन क्लब उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केले. जीवनाला आनंद देण्यासाठी कला उपयोगी ठरते. चित्रपटकला अनुभूतीला प्रगल्भ बनवते. आजकाल चित्रपट हिंसा, दहशत, मारामारी, भडक दृश्य आणि मसालेदार कथेने सजलेले असतात. परन्तु 50, 60 व 70 या दशकातील उत्कृष्ट कथानक असलेल्या चित्रपटांनी त्याकाळातील पिढीला प्रगल्भ बनविण्यात योगदान दिले. आता साधने बदललेली आहेत, जुन्या काळातील व्हीसीआर, कैसेट बंद झाल्यात. टी.व्ही.चॅनल आणि यु ट्यूब माध्यमांद्वारे चित्रपट सहज उपलब्ध होतो असे ते म्हणाले.

दर शुक्रवारी लघुचित्रपटांची मेजवानी
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासाबरोबर कलेचा आनंद घेता यावा तसेच मनोरंजनाद्वारे त्यांचे प्रबोधन घडावे म्हणून हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलात्मक चित्रपट, लघुचित्रपट दर शुक्रवारी सोहम हॉल येथे दाखविले जाणार आहेत. त्यासाठी एम.जे.फिल्म अ‍ॅप्रिसिएशन क्लब स्थापन करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी या उपक्रमाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करुन सुयोग्य नागरिक होण्यासाठीचे महत्व पटवून सांगितले. मागील वर्षी दाखविलेल्या चित्रपटांविषयीची माहिती प्रा.विजय लोहार यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केली.या क्लबच्या वतीने ऑगस्ट महिन्यात ‘याद करो कुरबानी…’ अंतर्गत राष्ट्रभक्तीचे चित्रपट दाखलेले जातील असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला 150 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत इंगळे याने केले. के.सी.ई.चे समन्वयक चंद्रकांत भंडारी, राकेश वाणी, सुभाष तळेले यांची उपस्थिती होती.