अनुभूती निवासी स्कुलच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत यश

0

जळगाव । जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीकोनातून 2007 मध्ये साकारलेल्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या आज जाहीर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता दहावीतून रिया जैन (95 टक्के, 571 गुण) मिळवून प्रथम, सुमिरन डफारे (95 टक्के, 567 गुण) मिळवून व्दितीय तर श्रमण पांडे (93 टक्के, 560 गुण) मिळवून शाळेत तृतिय आला आहे. 10 वी व 12 वी इयत्तेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी अनुभूती स्कूलने कायम ठेवली असून राष्ट्रीय पातळीवर आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखविली. बारावीच्या निकालात यश अग्रवाल (92 टक्के, 458 गुण) मिळवून प्रथम, दर्शन चोरडिया (91 टक्के, 455 गुण) व्दितीय तर अभिजित महाकाळ (90 टक्के, 450 गुण) संपादन करून शाळेत तृतीय.

वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही नियोजन
या शैक्षणिक वर्षात एकूण 50 विद्यार्थ्यांनी दहावीची तर 12 ची परीक्षा एकूण 36 विद्यार्थ्यांनी दिली होती. या दोन्ही निकालात अनुभूती निवासी स्कूलच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना पर्यावरणापासून ते जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळावी, यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जाते. अनुभवाधारीत व गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना शिकता यावे यावर शाळेत पाचवी पासूनच विशेष भर दिला जातो.

पुस्तकी ज्ञानासोबत विकासावर अधिक भर
‘अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान, गुणवत्तेसोबत शारिरीक व आध्यात्मिक विकास साध्य केला आहे. या बाबीचे खूप मोठे समाधान वाटते.’ अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे. स्कूलचे प्राचार्य जे.पी. राव यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, ‘उत्तम शिक्षक व संस्कारक्षम वातावरण ही शाळेची अत्यंत जमेची बाजू आहे. त्यामुळेच शाळेचा लौकीक सर्वदूर पसरला आहे’. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.