अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘नृत्य मल्हार’मध्ये वर्चेस्व

0

जळगाव । पुणे येथे झालेल्या नृत्य मल्हार या राज्यस्तरीय आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या संपूर्ण राज्यातील शाळांमधून जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. मोठ्या गटाच्या संघाने राज्य शासनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर लहान गटाने तृतीय क्रमांचे पारितोषिक पटकाविले.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व दूरदर्शन यांच्या संयुक्त सहकार्याने या वर्षांपासून नृत्य मल्हार ही आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा जिल्हा, विभागीय व राज्य पातळी अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन्ही संघ (लहान संघ इयत्ता 5 वी ते 7 वी आणि मोठा संघ इयत्ता 8 वी ते 10 वी) सहभागी झाले होते. दोन्ही संघ जिल्हा पातळी व नाशिक विभागीय पातळी अशा दोन्ही पातळ्यांवर सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.

रणपा नृत्य सादर
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तीन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 900 शाळांमधील 29 संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. यातुन अनुभूतीच्या दोघं संघांनी पारितोषिक मिळविले हे विशेष.पुणे येथे राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा दि. 29 व 30 जानेवारी दरम्यान झाली. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोठ्या गटाच्या संघाने ‘रणपा’ हे लोकनृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. तर याच स्पर्धेत शाळेच्या लहान संघाने ‘धनगर नृत्य’ सादर केले. लहान गटाच्या संघाने तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

यांनी केले कौतुक
दोन्ही नृत्यांचे दिग्दर्शन शाळेचे नृत्य शिक्षक ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी केले.अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन्ही संघांच्या यशाबद्दल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, शाळेच्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.