जळगाव- अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी तिन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी ५० मूर्ती तयार केल्या असून त्याची स्थापना केली जाणार आहे.
अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून अनुभूती स्कूलमध्ये जैन इरिगेशनचे प्रिटींग विभागातील सहकारी रवींद्र कुलसे, कलाशिक्षक सचिन राऊत, रामनिरंजन मोहता, प्रितम दास यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ५० गणेश मूर्ती तयार केल्या असुन पर्यावरणपुरक रंगांचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्ती ते स्वत: घरी घेवून जाणार असून स्थापना करणार असल्याचे कलाशिक्षक सचिन राऊत यांनी सांगितले