जळगाव। अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेचे दशकपूर्ती वर्ष सुरू आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम अनुभूती व्यवस्थापनाने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत खेळाडूंसाठी ‘क्रीडानुभूति’ची निर्मिती करण्यात आली. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भविष्यात भरीव कामगिरी करावी असे जैन उद्योग समुहाचे संस्थापक दिवंगत स्व.भवरलाल जैन यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्या ‘क्रीडानुभूति’ चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे, पद्मश्री ना. धों. महानोर, संघपती दलिचंद जैन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. अभंग जैन यांच्याहस्ते फुटबॉल मैदानाची फीत सोडून तर दलीचंद जैन यांच्याहस्ते श्रीफळ फोडून क्रीडांगणाचा शुभारंभ केला. यानंतर अनुभूती इंटरनॅशनल स्कूल व जैन स्पोर्टस कॅडमीच्या खेळाडूंमध्ये फुटबॉलचा सामना रंगला.
सर्वांगिण विकासासाठी कौशल्याचा वापर
संघपती दलिचंद जैन यांचा सत्कार ज्ञानपिठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते तर डॉ.सुभाष चौधरी यांचा सत्कार पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाला. यावेळी दलिचंद जैन यांनी क्रीडाविषयी आपले विचार मांडले. ‘देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्यातील आहे त्या कौशल्याचा वापर केला पाहिजे. अहिंसा, सत्य हे विचार प्रत्यक्ष आचारणात आणून खेळाडूवृत्तीने जीवन जगले पाहिजे.’ असे मार्गदर्शन दलिचंद जैन यांनी यावेळी केले. श्रध्देय मोठेभाऊंना खेळाबद्दल आदर होता. त्यांचे खेळ आणि खेळाडूंवर प्रेम होते. खेळाडुंमूळे समृध्द पिढी तयार होते, असे विचार प्रास्ताविक करतांना अतुल जैन यांनी मांडले.
विविध खेळांसाठी सुसज्जता
स्व.भवरलाल जैन यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय संस्कार निर्माण व्हावेत, यासाठी अनुभवावर आधारीत शिक्षण प्रणालीचा प्रयोग अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेत केला. या शाळेचे हे दशकपूर्तीवर्ष सुरू आहे. त्यामुळे शाळेत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह उपक्रम शाळेत राबविले जात आहे. खेळाडूंसाठी चांगल्या दर्जाचे क्रीडांगण असावे या भावनेतून ‘क्रीडानुभूति’ची निर्मिती मोठेभाऊंच्या प्रेरणेने करण्यात आलीय. यामध्ये फुटबॉल, बास्केटबॉलसाठी विशेष क्रीडांगण, टेबल टेनिस, बॅडमिंटन हॉल आहे. ‘क्रीडानुभूति’चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपिठ विजेते पद्मश्री भालचंद्र नेमाडे, पद्मश्री ना. धों. महानोर, संघपती दलीचंद जैन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन आदी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
सहव्यवस्थापकीय संचालक, अजित जैन, अतुल जैन, गिरधर ओसवाल, अनुभूती स्कुलच्या संचालिका निशा जैन, डॉ. सुभाष चौधरी, वास्तुविशारद शिरीष बर्वे, गिमी फराद, फार्म फ्रेशचे कार्यकारी संचालक सुनिल देशपांडे, नगरसेवक अमर जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य व निमंत्रीत मान्यवर उपस्थित होते. बॅडमिंटन, टेबल टेनीस, कॅरम, बुद्धिबळ हॉलचे उद्घाटन आत्मन व अऩ्मय जैन यांच्याहस्ते फीत सोडून करण्यात आले. यावेळी अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.