अनु.जमातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित !

0

तीन वर्षानंतरही उपेक्षाच ; पालकवर्गात तीव्र संताप

यावल- इयत्ता पहिली ते दहावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृती मिळत नसल्यामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यत्त होत आहे. आदिवासी विकास विभागाची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृती गेल्या तीन वर्षापासून मिळत नसल्याने पालकवर्गात शासनाच्या भोंगळ व उदासीन कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तीन वर्षापासून प्रत्येक शाळांनी ऑफ लाईन फार्म भरले असून विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृती अद्यापही जमा झालेली नाही. दोन वर्षापासून ऑनलाईन फार्म भरूनही अद्यापही शिष्यवृती मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गात शासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यत्त होत आहे.

ऑनलाईन कारभारामुळे शिष्यवृत्तीस उशीर !
यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात चौकशी केली असता आम्ही पूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकाकडून कागदपत्रे जमा करून शिष्यवृतीचा धनादेश जिल्हा परीषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे दिला जात असल्याचे सांगण्यात आले तर शिक्षणाधिकारी हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचे सांगण्यात आले. आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृती पुर्वी मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाल्यावर शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांचा खात्यात जमा केली जात होती मात्र ऑनलाईन कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्यास उशीर होत आहे. आदिवासी वाल्मिक राज फाऊंण्डेशनमार्फत अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळावी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयातून माहिती देण्यास दिरंगाई होत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळणार कधी? असे पालकवर्गात बोलले जात आहे.