अनेकदा समज-गैरसमज तथ्यहीन : खडसे

0

पुणे । वैवाहिक जीवनातील कटुता टाळण्यासाठी उभयतांनी काही पथ्ये पाळायला हवीत. अनेक वेळा समज-गैरसमज तथ्यहीन असतात, हे जाणून घ्यावे. आपली संस्कृती, ठेवा जपावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. भ्रातृमंडळ, पुणे यांच्यावतीने लेवा पाटीदार वधू-वर परिचय मेळावा श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन एकनाथ खडसे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक नामदेव ढाके, अ‍ॅड. संजय राणे आदी उपस्थित होते. तसेच मंडळाच्या वधू-वर सूचीचे प्रकाशन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘आजोबा’ म्हटले तर चालेल…
समाजातील प्रत्येकाने काम करून घेण्यासाठी भाऊ, पिता, अगदी आजोबा या नात्याने खडसेसाहेबांकडे जावे, असे खर्चे म्हणाले. ‘आजोबा’ असा उल्लेख करताना ते थोडे थांबले… ‘आणि असे म्हटले तर चालेल ना!’ असे खडसे यांना विचारले. ‘हो चालेल… आता माझे 66 वय चालू आहे,’ असे खडसे यांनी मोकळेपणाने सांगितले.

नामदेव ढाके महापौर होतील
नामदेव ढाके हे पिंपरी-चिंचवडमधील आपल्या समाजाचे धडाडीचे नगरसेवक आहेत. भावी काळात ते निश्‍चितच महापौर होतील, असे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे म्हणाले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करीत रहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

लग्न टिकवणे हे सर्वच समाजापुढे आव्हान
समाजात सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे, मुले-मुली कमवू लागली. पण त्याबरोबर घटस्फोटांचे प्रमाणही वाढत असून त्यामुळे लग्न टिकविणे हे सर्वच समाजापुढे आव्हान ठरले आहे. किरकोळ स्वरूपाच्या गैरसमजातून जोडीदार एकमेकांना सोडून गेल्याची उदाहरणे आहेत. सुशिक्षितांमध्ये अहंकार अडथळा ठरतो; असे मी पाहिले आहे. कटूप्रसंग येऊ नयेत याकरिता पथ्ये पाळावीत, असे मार्गदर्शन खडसे यांनी वधू-वरांना केले.

भ्रातृमंडळाच्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा
भ्रातृमंडळ पुणेच्या उपक्रमाची खडसे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. परिश्रमपूर्वक सलग तीस वर्षे वधू-वर मेळावे आयोजित केले. 87 साली पहिला मेळावा झाला. त्यानंतर प्रतिवर्षी प्रतिसाद वाढून उपक्रम यशस्वी होत राहिला, असे खडसे यांनी नमूद केले. मनपसंत साथीदार मिळावा याकरिता हे व्यासपीठ मिळाले असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

राज्य व परदेशातूनही सहभाग
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष आणि लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले. यावेळी मंडळाचे सचिव अनिल बोंडे, खजिनदार जितेंद्र भारंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात 1100 मुला-मुलींची नोंदणी झाली, अशी माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली. पुण्यातील वधू-वर परिचय मेळाव्यात राज्यभरातून व परदेशातूनही लोक सहभागी होतात, असेही त्यांनी सांगितले. वधू-वरांचा परिचय, नोंदणी आदी नियोजन शिस्तबद्ध होते. खानदेशी खाद्यपदार्थांचेही स्टॉल होते, अनेकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.