अनेकांना गंडविणारे पिता-पुत्र अखेर जेरबंद

0

जळगाव । गेल्या काही वर्षांपासून पिता-पुत्राच्या जोडीने अनेक ठिकाणी डल्ला मारत अनेकांना गंडविले. यासोबतच अनेक मार्केटांमधील दुकानांमध्ये चोरून करून साहित्य चोरून नेले. तर मंगळवारी 27 मार्च रोजी गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट हाऊसमधून त्यांनी गाय-वासराची मूर्ती चोरली होती. सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या या दोन्ही भामट्यांविषयी बुधवारी आणि गुरूवारी वृत्तपत्रात फोटोसह वृत्त प्रकाशीत झाले होते. त्या फोटोंच्या आधारावर शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या पथकाने गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या दोन्ही भामट्यांना त्यांच्या कोेल्हे हिल्स परिसरातील घरातून जेरबंद केले आहे. यावेळी त्यांच्या घरातून किरकोळ साहित्य मिळून आले असून पोलिसांकडून पिता-पुत्रांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दोघांनी केलेल्या चोर्‍यांची माहिती दिली आहे.

या ठिकाणी केल्या चोर्‍या……
शहरातील गोलणी मार्केटमधील जलराम गिफ्ट हाऊस या दुकानात 27 मार्च रोजी सायंकाळी 6.25 वाजता पिता-पुत्राच्या जोडीने गाय-वासराच्या मूर्तीची चोरी केली होती. ह्या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर याच पिता-पुत्राने जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या फळ विक्रेत्याकडून फळे चोरली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळ फुलविक्रेत्यालाही अशाच पद्धतीने गंडविल्याचे समोर आले. यातच एका नगरसेवकाची दुचाकी देखील यांनी चोरून पोबारा केल्याचे समोर आले. गुरूवारी पुन्हा या पिता-पुत्राच्या जोडीने अनेक चोर्‍या केल्याचे फोटोसह वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलिसांनी लागलीच फोटोच्या आधारावर या भामट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

चोरलेली मूर्ती केली हस्तगत…
शिंदे पिता-पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी जलाराम गिफ्ट हाऊसमधून चोरलेली गाय-वासराची मूर्ती त्यांच्या घरातून हस्तगत केली आहे. तसेच त्यांच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीच्या मसाल्यांचे पाकीटेही सापडली आहेत. ते सुद्धा त्यांनी चोरलेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबरोबर चोरी केलेले किरकोळी साहित्य घरात मिळून आले.

शंका नको म्हणून घेऊन जायचे कार
शहरात रामेश्वर कॉलनीत राहणार्‍या एका नातेवाईची कार घेऊन चोरटे पिता-पुत्र चोर्‍या करीत होते. त्या विषयी त्या नातेवाईकाला माहित नव्हते. वर्ष भरात त्यांनी 10 ते 15 वेळा कार घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. पिता-पुत्र कार घेऊन दुकानात जायचे. त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर शंका येत नव्हती. कार लावून वस्तू बघण्याच्या बहाण्याने चोर्‍या करण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. यासोबत दुकानांमध्ये जावून साहित्य खरेदीचा बहाणा करत दुकानमालकांना पिता बोलण्यात गुंतवून ठेवून पुत्र साहित्य चोरी करायचा. अनेक ठिकाणी अशाच पध्दतीने दोघांनी चोर्‍या केल्याचे समोर आले आहे.

दोन महिन्यानंतर घर बदलणे
सुनील शिंदे हा मुळचा जामनेर तालुक्यातील पाथरी येथील आहे. त्या ठिकाणी त्याची शेती आहे. मात्र अनेक वर्षापासून शिंदे कुटुंबीय जळगावातच राहतात. त्यांचा सकाळी उठल्यानंतर एकच धंदा होता. तो म्हणजे कोणत्या दुकानात काय चोरी करायचे. दररोज शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते चोर्‍या करीत होते. चोरीच्या प्रकाराबाबत घरमालकांना शंका येऊ नये, म्हणून ते दर दोन ते तीन महिन्यात घर बदलायचे.

या दोन्ही चोर पितापुत्रांवर शेंदुर्णी, पहूर पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली आहे. त्या ठिकाणही त्यांनी माहिती पाठवली आहे. यासोबतच अनेक दुकानांमधून मसाल्याचे पाकिट सुध्दा चोरून नेल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षात या पिता-पुत्रांनी अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या असून त्याबाबत पोलिस त्यांची कसून चौकशी करित आहेत.

सापळा रचून पकडले
गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट गॅलरी या दुकानातून चोरी केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, वासूदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, नवजीत चौधरी, संजय भालेराव, दुष्यंत खैरनार यांच्या पथकाला भामट्यांना पकडण्यासाठी पाठविले होते. त्यांनी बुधवारी रात्री 11.30 वाजता कोल्हे हिल्स परिसरातील त्यांच्या घराजवळ सापळा लावला. मात्र, पोलिस आल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही पितापुत्र रात्रीच गायब झालेत आणि घरी आलेच नाहीत. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ते घरी आले. त्यावेळी शहर पोलिसांच्या पथकाला पिता-पुत्र घरी आल्याची माहिती मिळताच त्यांनी कोल्हे हिल्स परिसर गाठत सुनील नारायण शिंदे (वय 50), चंद्रशेखर सुनील शिंदे (वय 18) या दोन्ही पिता-पुत्रांना ताब्यात घेतले.