अनेकांना मी राजकारणातून निवृत्त होईल असे वाटत होते; पवारांचा भाजपला टोला !

0

बारामती: आज गुरुवारी बारामती येथे कृषीप्रदर्शन सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी भाजप आणि भाजप नेत्यांना टोला हाणला. अनेकांना मी राजकारणातून निवृत्त होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने विशेषत:महाराष्ट्रातील तरुणाने तसे काही घडू दिले नाही अशा शब्दात भाजपला टोला लगावला. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचा सन्मान करण्यात आला. यावरून त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, राजकरणातून निरोप देण्याचा हा प्रयत्न आहे की काय असे म्हणत शरद पवारांनी मिश्कील शेरेबाजी केली.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रदर्शन फेरी मारली. कृषी प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सिनेअभिनेते अमीर खान, कृषिमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शरद पवार यांचे राजकारण संपले आहे असे वक्तव्य केले होते. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांचे राजकारण संपले आहे असे भाष्य केले होते. त्याचा समाचार शरद पवारांनी आज बारामतीला घेतले.