अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचे आगमन

0

मुंबई :- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (रविवार) उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील लोअर परळ, वरळी, दादर आदी भागात पावसाचा जोर होता. तसेच उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडूप येथेही पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई आणि विरार या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज विकेण्ड असल्यामुळे सुट्टीचा पावसाळी अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांना चांगली संधी असली तरी, पावसामुळे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना वाहतूकीच्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान पावसामुळे जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत. तसेच ठाण्यातील तीन हात नाका परिसरात एक झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.