अनेक योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय करावा – पापुळे

0
गृहउद्योग प्रशिक्षणवर्गात केले मार्गदर्शन
निगडी : छोट्या छोट्या गोष्टींमधून उद्योग उभा राहू शकतो. इच्छा असेल तर ठरवलेली कोणतीच गोष्ट अशक्य नसते. खादी ग्रामोद्योगतील अनेक योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करावेत, असे मत खादी ग्रामोद्योग विभागाचे निवृत्त अधिकारी वैजनाथ पापुळे यांनी निगडी येथे व्यक्त केले. उद्योजकता स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत निगडी येथील नॉव्हेल इन्स्टिट्यूटच्यावतीने गृहउद्योगाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामोद्योगमध्ये 344 योजना
पारंपरिक व्यवसायातून उद्योगासाठी मॉडेल टच कसा द्यावा हे सांगताना पापुळे म्हणाले की, खादी ग्रामोद्योग विभागात 344 योजना आहेत. कुठला व्यवसाय निवडावा याचे मार्गदर्शन, जिल्हा उद्योग केंद्र तसेच शासकीय योजनामधून केले जाते. बँक व महामंडळाच्या विविध योजना, सबसिडीज, महिलांसाठीच्या विशेष योजना, प्रकल्प अहवाल याबाबत त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. उद्योगासाठी लागणारी कागदपत्रे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, शैक्षणिक दाखले, ज्या ठिकाणी उद्योग प्रस्तावित होणार आहे त्या जागेचा पुरावा, तसेच वनसंपत्ती वर आधारित उद्योग, पॉलिमर व रसायनांवर आधारित उद्योग, वस्त्रोद्योग आदी उद्योगाबाबत माहिती देऊन प्रश्‍नांचे निरसन केले. या प्रशिक्षणात 150 सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गोरखे यांनी केले. सूत्रसंचालन रवी घाटे यांनी केले.