परिसंवादात शशिकांत लिमये यांची माहिती
चिंचवड : भारतात कलकत्ता, हैद्राबाद, दिल्ली, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो सुरू करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मेट्रोचे काम चालू आहे. याशिवाय वेगाने काम हेही वैशिष्ट्य आहेच. अनेक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन महामेट्रोे पुणेकर तसेच पिंपरी-चिंचवडकरांसाठी 2021 पर्यंत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्ग खुला करणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रो प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी येथे दिली. येथे पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने महामेट्रोवर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे मेट्रो प्रकल्प कमिटीचे सदस्य रमेश राव, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के, रोटरीचे बिमल रावत, अनघा रत्नपारखी, विलास गावडे, वर्षा पांगारे, संजय सोंडेकर, प्रदीप वाल्हेकर, उज्वला जोशी आदी उपस्थित होते.
इतर वाहतूक सुविधांना जोडले जाणार
मेट्रोची वैशिष्ट्य सांगताना शशिकांत लिमये पुढे म्हणाले की, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास अथवा या मार्गिके दरम्यान बांधकामाच्या जागी काही अपघात झाल्यास महा मेट्रोकडून जलद कृतीदल तैनात करण्यात आले आहे. या जलदकृती दलमार्फत अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रवाशांना भुयारी मार्गाचा वापर करणे सोपे जावे यासाठी त्या मार्गावरील इतर वाहतूक सुविधांना एकमेकांशी जोडले जाणार आहेत (बस,रेल्वे), पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक दिसून येईल अशा पद्धतीने मेट्रो स्थानकाची रचना, मेट्रो मार्गावर नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सहयोग केंद्र, पहिल्या मेट्रो स्टेशनला सोलर सिस्टीम, अपघात व वाहतूक नियंत्रणासाठी जलदकृतीदल, अडथळा ठरणार्या वृक्षांचे पुनर्रोपण होणार. आभार प्रदर्शन संजय सोंडेकर यांनी केले.