संशयीतानेही केली आत्महत्या : अनैतिक संबंधातून घटना घडल्याचा संशय
उत्राण, ता.एरंडोल- शेतात राहणार्या पावरा समाजाच्या कुटुंबावर कुर्हाडीने हल्ला करण्यात आल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नीसह दोघे मुले गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेतील संशयीताने रेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेला अनैतिक संबंध असल्याची चर्चा असून पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेत सुकलाल रीया बारेला (38) यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी कारू सुकलाल भिलाला (32), मुलगी सीमा सुकलाल भिलाला (11) व मुलगा गोविंदा सुकलाल भिलाला (7) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या कुटुंबावर ज्ञानसिंग वालसिंग पावरा (22) याने हल्ला केल्याचा संशय असून त्याने या घटनेनंतर शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळावर कुठल्यातरी धावत्या गाडीखाली उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मृत ज्ञानसिंग पावरा याचा मोबाईल घटनास्थळी पोलिसांना आढळला आहे.
भल्या पहाटे उघडकीस आली घटना
मयत सुकलाल भिलाला यांचा मोठा रतन सुकलाल भिलाला हा नीलॉन्स कंपनीत कामाला असून तो गुरुवारी पहाटे चार वाजता शेतातील घरात परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मयत भिलाला व त्यांचे कुटुंब राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात वास्तव्यास आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची धाव
या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे, धनंजय येरूळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.