मलकापूर : लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम सुरु असतांना नवरदेवाचे एका महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध उघड झाले. याप्रकरणी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवरदेवाला अटक करण्यात आली. हळद लागलेल्या नवरदेवाला 30 एप्रिल रोजी अटक झाल्याने परीसरात खळबळ माजली आहे.
बिंग फुटताच नवरदेवाला सुटला घाम
मलकापुरातील एका मुलीचे मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील अमोल गणेश पारेकर याच्याशी 1 मे रोजी लग्न ठरले होते. तो गुजरातमधील सुरत येथे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत असून 30 एप्रिल रोजी वधू पक्षाकडील मंडळींना गुजरातमधून दूरध्वनीद्वारे अनोळखीने नियोजित वराचे विवाहितेचे अफेअर असल्याची माहिती देत पुरावाही दिला. नियोजित वराकडून फसवणूक होत असल्याचे पाहता नवरीने फोन करून अमोल पारेकरला जाब विचारला. त्यावेळी त्याच्या बोराखेडी येथील घरी नानमुखाची तयारी सुरू होती. दारातील मांडवात नवरदेवाला हळद लागलेली होती. नवरीने जाब विचारल्याचा राग आल्याने हळद लागलेला हातावर मेहंदी काढलेला नवरदेव काही जणांना घेऊन मलकापुरातील नवरीच्या घरी आल्यानंतर त्याने वाद घातला.
मलकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आपले लग्न तुटले, असे म्हणत नवरदेव निघून गेल्यानंतर या प्रकाराची तक्रार मुलीच्या आईने मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगीन घरातून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली. आरोपी नवरदेवाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.