नवापूर । भवरे शिवारातील 14 एप्रिल रोजी चार्याच्या गंजीत सापडलेल्या महिलेचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पानबारा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवाजी बाबाजी गावीत (47) रा.पानबारा व योहान जञ्या गावीत (37) रा.भवरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार भवरे येथील लक्ष्मण गोपु कोकणी यांच्या शेतातील चार्याच्या गंजीत 14 एप्रिल रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. आजुबाजूला चाकू व बियरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते.
मृतक महिलेच्या कपड्यावरून पटली ओळख
दरम्यान 15 एप्रिल रोजी पांघराणजवळील होलीपाडा येथील 22 वर्षीय युवकाने आपली आई 12 एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे खबर नवापूर पोलिसात दिली. पोलिसांनी मयत महिलेचे कपडे युवकाला दाखविल्यावर त्याने ते ओळखले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मयत महिला ही दररोज सकाळी सात वाजता शहरात येऊन सात ते आठ ठिकाणी धुणी-भांडी करीत होती. तिचा पती 15 वर्षापासुन लकव्यामुळे घरीच राहत असे. एक मुलगा छापरी येथे मावशीकडे तर दुसरा तिच्यासोबत राहत होता. मुलगी सुरत येथे कामास आहे.
मोबाईल नंबरवरून आरोपींचा शोध
12 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला फोन आला. त्यानंतर ती घराबाहेर पडली ती परत आलीच नसल्याचे कळल्यावर फोन नंबरवरुन काही माहिती मिळते का? त्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास पाटील, उपनिरीक्षक संगिता कदम, पो.का.दिलीप चौरे, कृष्णा पवार, गुमानसिंग पाडवी, योगेश थोरात, रितेश हिदवे, अविनाश कोकणी, निजाम पाडवी, मुकेश पवार यांच्यासह पथकाने सुरु केला. त्यानुसार त्यांना पानबारा येथील शिवाजी गावीत वय (47) यांच्यावर संशय आला. त्याची कुंडली काढल्यानंतर पानबारा येथे पोलीस गेल्यावर तो पळू लागला. त्याला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्यानेच महिलेचा खुन केल्याचे स्पष्ट झाले. महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातुन महिला वारंवार पैशांची मागणी करीत होती. त्याला कंटाळुन 12 एप्रिल रोजी योहान गावीत यास सोबत घेऊन लक्ष्मण कोकणी यांच्या शेतात बियरच्या बाटलीने डोक्यात फोडून गळ्यावर वार केले. चार्याच्या गंजीत त्यांचे मृतदेह लपविला. दोघांना अटक करण्यात आली त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गावितच्या विरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल असून एका महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल दाखल झाला होता, परंतु त्या वेळी महिलेने आपला जबाब फिरविल्याने त्याची सुटका झाली होती.