शिरपूर । तालुक्यातील मांजरोद येथे एकाचा शालक व मेहुण्याने मिळून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवार 13 रोजी उघकीस आली. दरम्यान या प्रकरणी थाळनेर पोलीसांनी संशयित दोघांना अटक केली असून बुधवारी शिरपूर येथे न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. भाटपूरा मांजरोद रस्त्यावर सोमवार 13 रोजी राजपूत रेंजर यांच्या सुबाभळीच्या शेतात चिंगा करणसिंग बारेला 16 याचा मृतदेह आढळला होता. घटनेचा तपास करीत असतांना मयाताच्या झोपडी शेजारी राहणार्या प्रकाश सुरसिंग बारेला याची पत्नी जसमाबाई हिच्याशी अनैतिक संबध असल्याचे उघड झाले. त्यामुळे हा खून अनैतिक संबधाच्या वादातून झाला असल्याचा संशय पोलीसांना आला. दरम्यान या प्रकरणी थाळनेर पोलीसांनी प्रकाश बारेला याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने मेव्हणा सखाराम बारेलासह मिळून खून केल्याची कबुली दिली.
सुती दोरीने आवळला गळा
16 फेब्रूवारी रोजी दोंघानी मिळून चिंगा बारेला याचा सुती दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतातच खड्डा खोदून पुरला. दरम्यान मयत चिंगा याचा भाऊ शिवा बारेला आपला भाऊ बेपत्ता असल्याने त्याच्या शोध घेत फिरत होता. त्यावेळी दोघ संशयित आरोपी शिवा सोबत फिरत होते. मात्र 13 मार्च रोजी मृतदेह आढळल्यानंतर पोलीसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यामुळे चिंगा याच्या खूनाचा तपास लागला. दरम्यान या प्रकरणी दोघांना अटक करून बुधवारी शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.