मुंबई । लहान मुलांमधील चित्रकलेच्या उपजत कलेचा विकास होण्यासाठी घाटकोपरच्या भटवाडीमध्ये अनोखी आपली छत्री आपणच रंगवा हे शिबिर घेण्यात आले. या स्पर्धेत छत्री रंगवताना मुले आनंदाने हरखून गेली. भरपावसात आपली छत्री अनोख्या पद्धतीने रंगवण्याची मजा वेगळीच असते. हा अनुभव लहान मुलांसह अनेकांनी घेतला. पावसाळ्यात आकर्षक आणि वेगळी छत्री आपण प्रत्येकजण शोधतच असतो. अनेकांकडे एकसारख्याच रंगांच्या छत्र्या असतात. आपल्या छत्रीची काही तरी वेगळी ओळख असावी, असे आपल्याला वाटत असते. आपल्या छत्रीला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी छत्री रंगवा हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरादरम्यान आपली स्वतःची छत्री आपणच रंगवण्याचा आनंद मुलांनी मनमुराद लुटला. शिवसेनेतर्फे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो स्थानिक नागरिक, महिला आणि प्रसिद्ध चित्रकारही सामील झाले होते. प्रत्येक जण आपली छत्री आकर्षक करण्यात रंगून गेला होता. छत्री रंगवण्याची एक अनोखी कलादेखील त्यांनी आत्मसात केली. या छत्र्यांमध्ये कोणी शायरी लिहिल्या होत्या, तर कोणी छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते. काहींनी सुलेखन करून छत्रीवर रंगांच्या छटा उमटवल्या, तर काहींनी शेतकरी आत्महत्यासारखा विषय छत्री रंगवून मांडला होता.
सहभांगीनी नोंदवल्या दिलखुलास प्रतिक्रिया
शिबिराचे आयोजक दीपक हांडे यांनी सांगितले की, कलेची जोपासना करण्यासाठी ही नवी संकल्पना आम्ही राबवली आहे. मोबाइलवर चित्र काढण्यापेक्षा यामध्ये मुलांनी भाग घेतल्याने त्यांचा त्यांना अधिक फायदा होणार आहे, तर हे शिबिर खूप आवडले, असे शिबिर पुढील वर्षी घ्यावे, असे शिबिरातील सहभागी मुलीने सांगितले. आतापर्यंत कागदावर पेंटिंग केली. परंतु, प्रथमच छत्रीवर पेंटिंग करण्याचा वेगळाच अनुभव घेतल्याचे दुसर्या बालचित्रकार मुलीने सांगितले. चित्रकार असलेल्या कलाप्रेमीने प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येक लहान मुलांकडे उपजत कला असते. बाजारात रेडिमेड छत्र्या असतात. छत्र्यावर ही कला का मांडू नये? ही चांगली संधी मुलांनी घ्यावी व कला जोपासावी.