यवतमाळ । शेतकर्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयावह परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले आपण ओळखली पाहिजे. शेतकर्यांचे दुःख समजून घेऊन अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. महागाव येथे बस स्थानकासमोर हजारो समर्थकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.
साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून पुष्पहार घालताना मा. रविकांत तुपकर, अमर हबिब, डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जि. प. अध्यक्ष भाऊराव चौधरी, महेंद्र कावळे, विशाल पांडे, अशोक तुमवार, अॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीष चव्हाण, प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथुल अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यांसह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते, तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला, तर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
साहेबराव करपे पाटील यांचे पुत्र साहेबराव करपे पाटील यांचे मूळगाव चिलगव्हाण येथे गावकर्यांनी चुलबंद ठेवून काळ्या रांगोळ्या काढल्या, सरपंच पंजाबराव पारध, माजी सभापती नरेंद्र खंदारे यांच्यासह गावकर्यांनी मंदिरासमोर बसून अन्नत्याग केला. दिवसभर महागाव आणि चिलगव्हाण येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि करपे कुटुंबापरी आणि शेतकर्यांसाठी शासन राबवत असलेल्या धोरणावर संवेदना व्यक्त केल्या. आंदोलनाचे वैशिष्ट्य शेतकरी आणि त्या अनुषंगाने शेतकर्यांसाठी झटणारे त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधी महिला आवर्जून उपस्थित होत्या.
पोशिंदाच खचला तर भयावह परिस्थिती
राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, त्यांना तातडीने कर्जमाफीसाठी तरतूद केली पाहिजे. मात्र सरकारकडून त्यादृष्टीने अजिबात लक्ष दिले जात नाही. अर्थसंकल्पातही शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. तरीही शेतकरी अशावादीच राहिला आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिली, तर राज्यातील शेतकरी कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदाच जर खचला तर अवघ्या समाजाला अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल.